Headlines

बसस्थानकात नयनरम्य रिंगण सोहळा:शालेय विद्यार्थ्यांच्या बालदिंडीने वेधले सर्वांचे लक्ष




ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल, नेवासा फाटा येथे मुळा एज्युकेशनचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, संत परंपरा, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या दिंडी सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दिंडी सोहळ्याचा मार्ग नेवासे बसस्थानक ते श्री ज्ञानेश्वर मंदिर असा होता. बसस्थानक परिसरात आकर्षक रिंगण सोहळ्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत नृत्य, लाठी-काठी प्रात्यक्षिके, पताका, पालखी, तायक्वांदो प्रात्यक्षिके आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पावली आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेला. दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी “पाणी वाचवा’, “ग्रीन इंडिया’, पर्यावरण संवर्धन यांसह विविध सामाजिक संदेश देत समाजजागृती केली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी भक्तीबरोबरच सामाजिक आणि पर्यावरणीय जबाबदारीचा संदेश दिला. या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, नारायण लोखंडे, कैलास कुंभकर्ण, महेश मापारी, नगरसेवक दिनेश व्यवहारे, स्वप्निल मापारी, अनिल शिंदे, प्रशांत वाघ, सुनील जाधव, जयदीप जामदार आदी उपस्थित होते. पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. माजी सभापती सुनीताताई गडाख, उदयन गडाख, डॉ. निवेदिता गडाख , उत्तमराव लोंढे आणि डॉ. विनायक देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध उपक्रमांचे आणि शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचे त्यांनी विशेष कौतुक केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *