Headlines

एका झुरळाने हुकूमशाहाला झुकवले!:तरुणांनी देशाला भयाच्या छायेतून बाहेर काढले, प्रधानांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया




गेल्या काही दिवसांपासून ‘नीट’ परीक्षा घोटाळ्यावरून अस्वस्थ असलेल्या देशाला तरुणांच्या ताकदीने भयाच्या छायेतून बाहेर काढले आहे, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आंदोलनकर्ते अभिजीत दीपके आणि देशभरातील तरुणांचे कौतुक केले. पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या कथित विधानाचा आणि सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचा चांगलाच समाचार घेतला. “एका झुरळाने हुकूमशाहाला झुकवले आहे,” असे सांगत त्यांनी ‘यशवंत’ चित्रपटातील नाना पाटेकर यांच्या प्रसिद्ध डायलॉगची आठवण करून दिली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “गेले काही दिवस आपला देश अस्वस्थ होता. अभिजीत दीपके, आंदोलन करणारे तरुण आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या त्यांच्या पालकांचे मी मनापासून अभिनंदन करतो. हा विषय केवळ एका राजीनाम्यापुरता मर्यादित नव्हता, तर या तरुणांनी संपूर्ण देशाला भयाच्या छायेतून बाहेर काढण्याचे काम केले आहे. गेल्या जवळपास १२ वर्षांपासून देशाच्या जनतेवर रोज काही ना काही दबाव टाकला जात होता. या देशात लोकशाही शिल्लकच राहिलेली नाही आणि बाकी सगळे झुरळे आहेत, अशाच आविर्भावात सत्ताधारी वागत होते.” खुर्चीत बसलोय म्हणून डोक्यात माज आणू नका; सरन्यायाधीशांना टोला आंदोलनातील घटकांचा ‘झुरळ’ असा उल्लेख केल्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावर कडक शब्दांत टीका केली. अभिनेते नाना पाटेकर यांच्या ‘यशवंत’ चित्रपटातील संवादाचा संदर्भ देत ठाकरे म्हणाले, “ज्यांनी या तरुणांना ‘झुरळ’ म्हटले होते, त्यांनी हे चांगलेच लक्षात ठेवले पाहिजे की आपण केवळ उच्च पदाच्या खुर्चीत बसलोय म्हणून डोक्यात माज आल्यासारखे वागू नका. देशातील युवाशक्ती जेव्हा एकत्र येते, तेव्हा ती काय करू शकते? याची ही फक्त एक झलक आहे. एका झुरळाने हुकूमशाहाला कसे झुकवले, हे आज देशाने पाहिले.” प्रधानांचा राजीनामा की खातेबदल? अजून दोन मागण्या बाकी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी सरकारवर संशय व्यक्त केला. “पत्रकार परिषदेला येण्यापूर्वी आम्ही अभिजीत दीपके यांची सोशल मीडिया पोस्ट पाहिली. त्यांनी आंदोलन अजून मागे घेतलेले नाही, कारण त्यांच्या अजून दोन मुख्य मागण्या बाकी आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी खरोखरच राजीनामा दिला आहे की त्यांचा केवळ खातेबदल करण्यात आला आहे, याबाबत सरकारकडून अजून कोणतीही स्पष्टता आलेली नाही,” असे ठाकरेंनी नमूद केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *