![]()
ऑरिक सिटीच्या दुसऱ्या टप्प्यात जमीन घेऊन उद्योग उभारण्यासाठी बिडकीन परिसरातील गावांमधील जमिनींना उद्योजकांकडून मोठी मागणी आहे. नव्याने होत असलेल्या ३२०० हेक्टर (सुमारे ८ हजार एकर) जमीन संपादनाची प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वीच तब्बल ५० टक्के जमिनीची नोंदणी उद्योजकांनी केली आहे. या विस्तार योजनेसाठी ऑरिकच्या स्वनिधीतील तब्बल २५०० कोटी रुपयांचा निधी भूसंपादनाकरिता वापरला जाणार असून येत्या वर्षभरात ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्योगांचा आढावा घेतला होता. या वेळी त्यांनी ऑरिकमध्ये ४० हजार कोटी रुपयांचे उद्योग प्रस्तावित असल्याचे सांगितले होते. नवीन भूसंपादनासाठी येत्या आठवड्यात नवीन अधिकारी प्राधिकृत करण्यात येणार आहेत. ऑरिक प्रशासनाच्या संपादनासंदर्भातील अधिकृत प्रस्तावानुसार पैठण तालुक्यातील पाडळी व निलजगाव, तर छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील घारदोन, घारदोन तांडा, खोडेगाव आणि गाडीवाट या ६ प्रमुख गावांमधील भूसंपादन करण्यात येणार आहे. ४०% उर्वरित जमिनीचा असा होईल वापर उर्वरित ४० टक्के जागेचा (३,२०० एकर) वापर नागरी पायाभूत सुविधा, रस्ते आणि पर्यावरणासाठी केला जाईल. यामध्ये रस्ते आणि वाहतूक कॉरिडॉरसाठी १० ते १५ टक्के, खुल्या जागा व हरित पट्ट्यासाठी १० टक्के, नागरी सुविधांसाठी ५ ते १० टक्के आणि व्यावसायिक व निवासी वापरासाठी ५ ते १० टक्के जागा राखीव राहील. ऑरिकच्या स्वनिधीतून भूसंपादनाला अर्थसाहाय्य बिडकीन भागात टोयोटा, एथर आणि जेएसडब्ल्यूसारख्या मोठ्या उद्योगांनी जागा घेतल्यामुळे ऑरिककडून विक्री करण्यात येणाऱ्या लहान-मोठ्या भूखंडांचे दरही कित्येक पटींनी वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या लिलावात ४ हजार रुपये प्रतिचौरस मीटर असा पायाभूत दर असलेले भूखंड १० हजार रुपये प्रतिचौरस मीटरपर्यंत गेले आहेत. या पार्श्वभूमीवर, ऑरिककडे सध्या उपलब्ध असलेला अडीच हजार कोटी रुपयांचा निधी भूसंपादनासाठी वापरला जाणार आहे. ६० टक्के औद्योगिक, तर ४० टक्के इतर वापरासाठी जागा एकूण ८ हजार एकरपैकी ४८०० एकर (६० टक्के) जमीन ही औद्योगिक वापरासाठी राहील. यातूनच १५ टक्के जागा ही प्रकल्पग्रस्तांना (पीएपी) परतावा भूखंड म्हणून देण्यात येणार आहे. उर्वरित ३२०० एकर (४० टक्के) जागा ही व्यावसायिक, रहिवासी, नागरी पायाभूत सुविधा, रस्ते आणि हरित पट्ट्यासाठी राखीव असणार आहे. प्रक्रिया सुरू “ऑरिकमधील भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. भूसंपादन पूर्ण होण्यापूर्वीच ४ हजार एकर औद्योगिक जमिनीला मागणी आली आहे. येत्या वर्षभरात हे भूसंपादन पूर्ण केले जाईल. यासाठी जमीन विक्रीतून उभारलेला स्वनिधी वापरण्यात येईल.’ – पी. डी. मलिकनेर, व्यवस्थापकीय संचालक, ऑरिक
Source link
नियोजन:भूसंपादन होण्यापूर्वी ऑरिकच्या 8 हजार एकरांपैकी 4 हजार एकर बुक, भूसंपादनासाठी 2500 कोटी वापरणार