Headlines

स्मार्ट कार्डमुळे एसटीची सेवा अधिक सुरक्षित, जलद, सुखकर होण्यास मदत:आमदार खोडकेंचे प्रतिपादन, आदिवासी कॉलनीतील एनसीएमसी शिबिराला प्रतिसाद‎




केंद्र व राज्य शासनाच्या डिजिटल उपक्रमांमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक, पारदर्शक आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर होत आहे. एनसीएमसी स्मार्ट कार्डच्या माध्यमातून प्रवाशांना रोख रकमेविना तिकीट व्यवहार करता येणार असून, प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुलभ होणार आहे, असे प्रतिपादन आमदार संजय खोडके यांनी केले. येथील काँग्रेसनगर रोडवरील आदिवासी कॉलनी स्थित वीरांगणा दुर्गावती सभागृहात एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड (नॅशनल कॉमन मोबीलीटी कार्ड, एनसीएमसी) शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. कार्डचे वितरण आमदार संजय खोडके यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मनपा स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, नगरसेवक रतन डेंडूले, सामाजिक कार्यकर्ते राम चव्हाण, शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष यश खोडके, राजाभय्या, विशाल चव्हाण, नीलेश शर्मा, विशाल उर्फ बाळा तायडे यांच्यासह एस.टी. महामंडळाचे अधिकारी, पदाधिकारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. दिवंगत उपमुख्यमंत्री लोकनेते अजित पवार यांच्या जयंतीप्रित्यर्थ शहरात सेवासप्ताह आयोजित केला असून, त्याअंतर्गत विविध लोकोपयोगी कार्यक्रम घेतले जात आहेत. स्मार्ट कार्डचा उपक्रम हा या लोकोपयोगी कार्यक्रमाचाच एक भाग आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एस.टी.) प्रवाशांना डिजिटल व सुलभ सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या योजनांची आखणी केली आहे. त्यामुळे येथून पुढे वेगवेगळ्या सवलतीस पात्र असलेल्या प्रवाशांना स्मार्ट कार्ड अनिवार्य केले आहे. हे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी नागरिकांना बरेच परिश्रम घ्यावे लागतात. त्यामुळे सेवा सप्ताहानिमित्त यंत्रणेलाच शिबिरस्थळी पाचारण करुन गरजू नागरिकांना स्मार्ट कार्ड तयार करुन दिले . या वेळी महिला व ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी वर्गाची उपस्थिती दिसून आली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण केले. त्यानंतर आमदार आमदार संजय खोडके यांच्या हस्ते फीत कापून शिबिराचे उदघाटन केले. या उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद लाभला. ज्येष्ठ नागरिक, महिला, नियमित एस.टी. प्रवाशांनी उपस्थित राहून एनसीएमसी कार्ड शिबिराचा लाभ घेतला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *