![]()
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट यांच्या ३९ व्या वर्धापन दिनानिमित्त व चॅलेंजर स्पोर्ट्स फाउंडेशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट १० के भक्ती रन २०२६ स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या रविवारी सकाळच्या प्रहरी पार पडली. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गोवा आदी राज्यातून आलेल्या हजारहून अधिक धावपटूंनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. अपंग धावपटूंचा देखील समावेश होता. श्री स्वामी समर्थ महाराज की जय… व हलग्यांच्या निनादात भक्ती रन स्पर्धेचा शुभारंभ न भुतो न भविष्यती संपन्न झाला. आरोग्य ते अध्यात्म हा प्रेरणादायी संदेश देणारी ही “भक्ती रन” स्पर्धा अक्कलकोटच्या पावन भूमीत संपन्न झाली. धावपटूंना शारीरिक तंदुरुस्ती, अध्यात्मिक उन्नती आणि भक्तीमय वातावरणाचा सुंदर संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळाला आहे. प्रारंभी या स्पर्धेचे उद्घाटन व ध्वजप्रदान ख्यातनाम अभिनेते भरत जाधव, मयूर पाटील, श्री वटवृक्ष स्वामी महराज देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले, उत्तर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, आणि चॅलेंजर स्पोर्ट्स फाउंडेशन, सोलापूरचे अतिश शहा, चंद्रशेखर गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास शिक्षण अधिकारी प्रशांत अरबाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा ए.आय.एम.एस. (आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आणि दीर्घ-अंतर शर्यतीची संघटना) प्रमाणित मार्गावर आयोजित करण्यात आली होती. मार्गावर धावपटूंना प्रेरणा मिळावी यासाठी पंचमहाभूत (पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश) या संकल्पनेवर आधारित प्रेरणादायी पोस्टर्स लावण्यात आले होते. उत्कृष्ट हायड्रेशन, वैद्यकीय मदत, फिजिओ, स्वयंसेवक आणि शिस्तबद्ध रेस व्यवस्थापनामुळे स्पर्धेचे सर्व स्तरांतून कौतुक झाले. या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले, तसेच त्यांच्या मित्रपरिवाराने स्वतः धावून सहभागी होत नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश दिला.भक्तीमय वातावरणाचा सुंदर संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळाला आहे. पुरुष गट (१६–३० वर्षे), प्रथम चैतन्य रुपनर, द्वितीय अभिनंदन सूर्यवंशी, तृतीय अंकुश हक्के. महिला गट (१६–३० वर्षे), प्रथम ज्योती बन्ने,द्वितीय मोनिका वाळके, तृतीय भक्ती मगदूम. दरम्यान या भव्य अक्कलकोट १० के भक्ती रन या आगळ्यावेगळ्या मॅरेथॉन स्पर्धेच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन लिंकचे उद्घाटन जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले होते. यामध्ये ३ कि.मी., ५ कि.मी. आणि १० कि.मी. अशा विविध गटांमध्ये सहभागी धावपटूंना बिब, टी-शर्ट, मेडल, प्रमाणपत्र, आकर्षक बक्षिसे, मेडिकल सपोर्ट, पौष्टिक नाश्ता तसेच उत्साहपूर्ण वातावरणाचा अनुभव मिळाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले, तर आभार अतिश शहा यांनी मानले.
Source link
अक्कलकोटमध्ये आरोग्य, अध्यात्म अन् भक्तीचा संगम:अक्कलकोटमध्ये 10 के भक्ती रन स्पर्धेत एक हजारांहून अधिक धावपटूंचा सहभाग