![]()
प्रतिनिधी | पंढरपूर श्री विठ्ठलाच्या दर्शनाची आस पूर्ण झाल्यानंतर आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा पार पडताच लाखो वारकऱ्यांनी रविवारी परतीचा प्रवास सुरू केला आहे. यामुळे पंढरपूरचे बस स्थानक, रेल्वे स्थानक तसेच प्रमुख रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. दरम्यान, मंदिर परिसर, दर्शन रांग वगळता शहरात सर्वत्र वातावरण अगदी सामान्य झाल्याचे दिसून येते. शनिवारी एकादशी सोहळा संपन्न झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न झाली. यानंतर एकादशीच्या दुपारपासूनच मोठ्या संख्येने भाविक आपापल्या गावी जाण्यासाठी रवाना झाले होते. त्यामुळे रविवारी दुपारी तीन वाजेनंतर पंढरपूर शहरातील मुख्य रस्त्यांवरील ताण कमी होऊन रस्ते मोकळे झाले. मात्र, एसटी बस स्थानक आणि रेल्वे स्थानक परिसरात परतीच्या प्रवासासाठी वारकऱ्यांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. विशेषता रेल्वेने परतणाऱ्या भाविकांची संख्या अधिक दिसून येत होती. गाड्यांची संख्याही वाढवली आहे. परतीच्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र, पोलिस प्रशासनाने केलेल्या चोख आणि नेटक्या नियोजनामुळे वाहतूक कोंडी टाळता आली आणि वाहतूक लवकर मार्गी लागली. रविवारी दुपारनंतर शहरातील रस्त्यावरील वाहतूक सामान्य झालेली होती.
Source link
वारकरी परतीच्या मार्गावर; बस अन् रेल्वेस्थानक गर्दीने फुलले:एकादशीला दर्शन घेऊन भाविक निघाले गावाकडे