Headlines

डॉ. विजय महाराज जगताप यांना वैष्णव पुरस्कार:ह.भ.प. विश्वनाथ महाराज इंगळे स्मृतीप्रित्यर्थ सन्मानित




प्रख्यात वारकरी कीर्तनकार आणि ज्येष्ठ व्यवस्थापनतज्ञ ह.भ.प. डॉ. विजय महाराज जगताप यांना यंदाचा ‘वैष्णव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ह.भ.प. विश्वनाथ महाराज इंगळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मेघा आणि जे.व्ही. इंगळे यांच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. कलाश्री संगीत मंडळाने बालशिक्षण शाळेच्या एमईएस सभागृहात आयोजित केलेल्या ‘नामाचा गजर’ या कार्यक्रमात डॉ. जगताप यांना सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप २१ हजार रुपये रोख आणि मानपत्र असे आहे. यावेळी मेघा व जे.व्ही. इंगळे, सुधाकर चव्हाण आणि श्रीनिवास जोशी उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर ह.भ.प. डॉ. विजय महाराज जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, हा पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आणि महत्त्वाचा आहे. कोणत्याही व्यक्तीला पुरस्कार मिळणे शक्य असते, परंतु ‘वैष्णव’ होणे ही खूप मोठी गोष्ट आहे. शाळेत असताना मित्रांसोबत भांडण झाल्यावर आईने ‘आपण वैष्णव आहोत, भांडायचं नाही’ असे सांगितल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली. संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देत डॉ. जगताप यांनी ‘वैष्णव’ धर्माचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले, “वैष्णव तो जया अवघी देवावरी माया” म्हणजे ज्याला सृष्टी, जग, प्रपंच आणि देहाचे तादात्म्य सोडून केवळ भगवंतावर प्रीती करता येते, तोच खरा वैष्णव होय. वैष्णवाचा धर्म म्हणजे विश्वमय जग होय. आपल्या सत्गुरू परंपरा श्रीमद सद्गुरु पांडुरंगनाथ महाराज जगताप यांच्या परंपरेचा वारसा पुढे चालवताना आयुष्यभर ‘वैष्णव’ होता यावे, एवढेच भगवंताकडे मागणं असेल, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. ‘नामाचा गजर’ या सांगीतिक कार्यक्रमात विविध संतांच्या रचना आणि अभंग सादर करण्यात आले. शाश्वती आणि पंडित सुधाकर चव्हाण यांनी ‘जय जय रामकृष्ण हरी’, ‘पंढरीची वारी आहे माझ्या घरी’ आणि ‘विठ्ठला रे, कंठ आळविता फुटला रे’ हे अभंग गायले. विराज आणि पंडित श्रीनिवास जोशी यांनी ‘नामाचा गजर गर्जे भीमातीर’, ‘अणुरेणीया थोकडा, तुका आकाशाएवढा’ आणि ‘कान्होबा तुझी घोंगडी चांगली’ या रचना सादर केल्या. पंडित कल्याणजी गायकवाड यांनी ‘वाट ही चालावी पंढरीची’, ‘मी गातो नाचतो आनंदे’ आणि ‘घागर घेऊन निघाली पाण्या गवळण’ आदी रचना रसिकांसमोर सादर केल्या. या कार्यक्रमात गायकांना हार्मोनियमवर गंगाधर शिंदे, तबल्यावर पांडुरंग पवार, पखवाजवर गंभीर महाराज अवचार आणि टाळावर मकरंद बादरायणी यांनी साथसंगत केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *