![]()
येथील पालखी रोड स्थित शांतिनिकेतन कॉलनीतील बंद पडलेला वीज पुरवठा सुरळीत करताना महावितरणचे कर्मचारी आणि नगरसेविकेचे पती, प्रशांत जाधव यांच्यात काहीसा वाद झाला. मुद्दा पोलिसांत जाईपर्यंतची भाषा बोलली गेली. त्यामुळे काही काळ तणावही निर्माण झाला होता. पर
.
हवेमुळे उशीरा रात्री शांतिनिकेतन कॉलनीमधील कडूलिंबाचे एक महाकाय झाड जमीनदोस्त झाले. या झाडामुळे एका घराची भिंत आणि कारचेही बरेच नुकसान झाले. एवढेच नव्हे तर महावितरणचे दोन खांबही जमीनदोस्त झाले. परिणामी शांतिनिकेतन कॉलनीसह शेजारची आशीष कॉलनी आणि नवाथे प्लॉटमधील काही गल्ल्यांमधील वीज पुरवठा खंडित झाला. हा वीज पुरवठा पूर्ववत व्हावा, यासाठी नागरिकांनी पहाटेपासूनच या भागातील नगरसेवक आणि महावितरण कर्मचाऱ्यांना विनंती, आर्जव करणे सुरु केले होते. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार सकाळी १० पासून मनपा व महावितरणच्या यंत्रणेतील काही कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले. मनपाच्या उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांनी जमीनदोस्त झालेले झाड कापण्याची प्रक्रिया सुरु केली. त्याचवेळी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पडलेले खांब आणि त्यावरील तारा बाजूला करण्याचे काम सुरु केले.
याच दरम्यान या भागाच्या नगरसेविका मंजुषा जाधव व नगरसेवक चेतन गावंडे आणि काही मान्यवर नागरिकही घटनास्थळी पोहोचले होते. काम सुरु असतानाच अचानक प्रशांत जाधव आणि महावितरणच्या एका कर्मचाऱ्यामध्ये शाब्दीक वाद झाला. त्यामुळे महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांनी दुरुस्ती कार्य बंद करण्याची भूमिका घेतली होती. परंतु उपस्थितांनी मध्यस्थीकरुन त्यांच्यातील वाद सोडविला. काही वेळाने दुरुस्तीकार्य पुन्हा सुरु करण्यात आले.
पडलेल्या खांबावर पथदिवे असल्यामुळे याकामी महापालिकेच्या प्रकाश विभागातील कर्मचाऱ्यांचीही मदत घेण्यात आली.झाड पडल्यामुळे महावितरणचे दोन खांबसुद्धा जमीनदोस्त झाले. ते उभे करुन तारा टाकणे आणि त्यानंतर वीज प्रवाह सुरळीत करणे याला बराच अवधी लागेल, असे प्रारंभापासूनच सांगण्यात आले होते. दरम्यान महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी युद्धस्तरावर धावपळ करुन खांब उभे करण्याचे काम सुरु केले आहे. मात्र उशीरा रात्रीपर्यंतही दुरुस्तीकार्य पुर्णत्वास गेले नव्हते. त्यामुळे स्थानिकांना आजची रात्रही काळोखातच काढावी लागणार आहे.
गैरसमजुतीतून वाद यासंदर्भात बोलताना प्रशांत जाधव म्हणाले, खांबावरील एलईडी दिवे शाबूत ठेवण्यावरुन आम्हा दोघांत बाचाबाची झाली. परंतु नंतर मात्र वाद मिटला. दरम्यान ‘दिव्य मराठी’ ने यासंदर्भात महावितरणचे नवाथेनगर भागाचे सहायक अभियंता अरविंद बोंद्रे यांच्याशीही संवाद साधला. ते म्हणाले, वाद वाढविण्याऐवजी लोकांना सेवा पुरविण्यावर आमचा भर असतो. त्यानुसार सामंजस्याची भूमिका घेण्यात आली. सध्या दुरुस्तीकार्य सुरु आहे.