![]()
राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा, कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन आणि आगामी निवडणुका या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना नेते भरत गोगावले यांना जाहीर सल्ला दिला, तसेच शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये (NDA) सामील होण्याबाबत अत्यंत सूचक विधान करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. भरत गोगावलेंना कानपिचक्या- ‘जबाबदारीने बोला’ देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांदरम्यान, शिवसेना मंत्री भरत गोगावले यांनी ‘एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत’ असे साकडे देवाला घातल्याचे म्हटले होते. यावर जयकुमार गोरे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. “राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस उत्तम काम करतात आणि त्यांनी स्वतः स्पष्ट केले आहे की ते महाराष्ट्रातच राहणार आहेत. त्यामुळे कोण वर (केंद्रात) जाणार आणि कोण खाली राहणार, हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाही. आपण मंत्रिमंडळातील सहकारी आहोत, त्यामुळे सर्वांनी जबाबदारीने बोलले पाहिजे आणि अशा चर्चांपासून दूर राहिले पाहिजे,” असा थेट सल्ला त्यांनी गोगावलेंना दिला. शरद पवार गटाच्या NDA मधील एन्ट्रीचे संकेत शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. यावर गोरे यांनी अत्यंत सूचक विधान करत ‘इंडिया’ आघाडीचे टेन्शन वाढवले आहे. “एनडीए म्हणून आम्ही एकसंध आहोत. माझ्या माहितीप्रमाणे एनडीएमध्ये एखाद-दुसरा पक्ष वाढतोय, पण तो कमी होण्याची कोणतीही शक्यता नाही. काही जण बातम्या चालवत आहेत, पण आमच्यात आणखी ‘अॅडिशन’ होणार आहे, ‘डिलिशन’ नाही,” असे म्हणत त्यांनी पवार गटाच्या संभाव्य प्रवेशाकडे इशारा केला आहे. गडकरींचा बचाव आणि विरोधकांवर टीका ई-20 पार्टी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. यावर गोरे यांनी गडकरींची भक्कम पाठराखण केली. “आज आपण आणि विरोधक ज्या रस्त्यांवरून चालत आहोत, ते रस्ते गडकरी साहेबांच्याच माध्यमातून झाले आहेत. मात्र, आपल्याकडे सर्वोत्कृष्ट कामाला बदनाम करण्याची रीत आहे आणि तीच पद्धत विरोधकांनी हातात घेतली आहे,” अशी टीका त्यांनी केली. कथित MPSC पेपरफुटीवरून रोहित पवारांना टोला राज्यात गाजत असलेल्या कथित एमपीएससी (MPSC) पेपरफुटीच्या प्रकरणावर बोलताना गोरे यांनी हे आरोप फेटाळून लावले. “माझ्या माहितीनुसार असा कुठलाही पेपर फुटलेला नाही. आमदार रोहित पवार यांचे MPSC सेंटर कदाचित दुसरे असेल,” असा खोचक टोला त्यांनी लगावला. सोलापूर आणि परिसरातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी एक दिलासादायक माहिती दिली. “उजनी लाभक्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे धरण जवळपास ९७ टक्के भरले आहे. एल निनोचे (El Nino) संकट असतानाही धरण भरल्याने मोठे संकट टळले आहे. त्यामुळे आता भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणेच 8 तास सुरळीत वीजपुरवठा होणार आहे.” दरम्यान, धाराशिव येथील ‘आपला जीव धाराशिव’ या जिल्हा परिषदेच्या बॅनरवरून झालेल्या वादावरही त्यांनी भाष्य केले. “झेडपीने (ZP) हाती घेतलेला हा प्रकल्प उत्तम असून, ग्रामीण भागात ग्रंथालयांसह विविध सेवा देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विरोधकांनी कामाच्या उणिवा शोधाव्यात, राजकीय उणिवा शोधू नयेत,” असे ते म्हणाले. हेही वाचा… ‘नीट’नंतर राज्यात MHT-CET मध्येही घोटाळ्याचा आरोप : बारावीत 40 टक्के अन् सीईटीत 99 पर्सेंटाईल कसे? शिक्षकाचा व्हिडिओतून गंभीर दावा देशभरात गाजलेल्या ‘नीट’ पेपरफुटीच्या वादात ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आक्रमक आंदोलनामुळे थेट केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. दिल्लीतील ही धग शांत होण्यापूर्वीच, आता महाराष्ट्रात ‘एमएचटी-सीईटी’ (MHT-CET 2026) परीक्षेत ‘नीट’पेक्षाही मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत, आमदार रोहित पवार यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते महादेव बालगुडे यांनी एका शिक्षकाचा व्हिडिओ समोर आणत परीक्षा यंत्रणेच्या विश्वासार्हतेवरच मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. “बारावीत जेमतेम पास झालेल्या विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये १०० पर्सेंटाईल कसे मिळाले?” या एका प्रश्नाने आणि पैशांचा वापर करून गुण वाढवल्याच्या दाव्याने सध्या राज्याच्या शिक्षण वर्तुळात भूकंप आणला आहे. सविस्तर वाचा…
Source link
कोण वर जाणार हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाही!:जयकुमार गोरेंनी भरत गोगावलेंना सुनावले, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबतही दिले मोठे संकेत