Headlines

पिंपरी-चिंचवडसाठी HCMTR, E-RTS प्रकल्पाला गती:मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून तातडीने अंमलबजावणीचे निर्देश




मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या वाहतूक गरजा लक्षात घेऊन एचसीएमटीआर (हाय कॅपेसिटी मास ट्रान्सिट रूट) आणि ई-आरटीएस (इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्सिट सिस्टीम) या महत्त्वाकांक्षी सार्वजनिक वाहतूक प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश दिले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने प्रायोगिक प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करून नागरिकांना आधुनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी सांगितले. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाढती लोकसंख्या, वेगाने होणारे शहरीकरण आणि सार्वजनिक वाहतुकीवरील ताण लक्षात घेऊन भविष्यातील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह महसूल, नगर विकास, वित्त आणि पर्यावरण विभागाचे अपर मुख्य सचिव उपस्थित होते. तसेच, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त, पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त आणि दोन्ही शहरांचे पोलीस आयुक्तही उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ई-आरटीएस प्रणालीचे संगणकीय सादरीकरण केले. ही अत्याधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मेट्रोप्रमाणेच वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी असेल. रबर टायरवर धावणारी ही पूर्णतः इलेक्ट्रिक वाहने एका वेळी २४० हून अधिक प्रवाशांना घेऊन जाऊ शकतील, अशी माहिती त्यांनी दिली. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे १७ किलोमीटर लांबीचा प्रायोगिक मार्ग विकसित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. यात गोडाऊन चौक, कुदळवाडी चौक, ऑटो क्लस्टर, काळेवाडी फाटा, जगताप डेअरी चौक आणि वाकड या प्रमुख भागांचा समावेश आहे. हा प्रायोगिक प्रकल्प महामेट्रोच्या सहकार्याने सुमारे दीड वर्षांच्या कालावधीत कार्यान्वित करण्याचे नियोजन बैठकीत सादर करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *