Headlines

एमएचटी-सीईटी गैरप्रकारांची उच्चस्तरीय चौकशी करा:अभाविपची राज्य सरकारकडे मागणी; विद्यार्थी संभ्रमात




अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. कथित पेपरफुटी, पर्सेंटाइलबाबत विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि काही क्लासेसशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे अभाविपने म्हटले आहे. माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, काही विद्यार्थी आणि राजकीय व्यक्तींनी एमएचटी-सीईटीच्या पर्सेंटाइल, गुणवत्ता यादी आणि काही उमेदवारांच्या निकालांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यावर सीईटी सेलने स्पष्टीकरण दिले आहे की, पर्सेंटाइलची गणना मान्यताप्राप्त नॉर्मलायझेशन प्रक्रियेनुसारच करण्यात आली आहे. दरम्यान, अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेदरम्यान काही व्हिडिओ आणि कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. या क्लिपमध्ये परीक्षा केंद्रांवर आर्थिक व्यवहारातून गैरप्रकार झाल्याचे दावे करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर, सीईटी सेलने राज्य सायबर सेल आणि आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संबंधित क्लिपची सत्यता तपासण्याची आणि त्या तयार व प्रसारित करणाऱ्यांचा शोध घेण्याची मागणी सीईटी सेलने केली आहे. अभाविपचे प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी यांनी यासंदर्भात सांगितले की, महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य एमएचटी-सीईटी परीक्षेवर अवलंबून आहे. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेबाबत निर्माण झालेला प्रत्येक संशय दूर होणे आवश्यक आहे. आरोप खोटे असल्यास ते विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट करावेत आणि आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करून जबाबदारी निश्चित करावी, असेही त्यांनी नमूद केले. अभाविपने राज्य सरकारकडे या सर्व कथित गैरप्रकारांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासोबतच, व्हायरल ऑडिओ-व्हिडिओंची न्यायवैद्यकीय तपासणी करावी, पर्सेंटाइल व नॉर्मलायझेशन प्रक्रियेत पारदर्शकता वाढवावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास कायम राहण्यासाठी आवश्यक सुधारणा तातडीने राबवाव्यात, अशा मागण्या अभाविपने केल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *