![]()
मराठवाड्यातील उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्राला अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर (सीएमआयए) आणि एमआयटी, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने एक विशेष कौशल्य विकास प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ १६ एप्रिल रोजी ‘स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन’ प्रशिक्षण सत्राने होणार आहे. सीएमआयए आणि एमआयटी यांच्यात नुकताच सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. या करारांतर्गत वर्षभर उद्योगजगत, व्यवस्थापन क्षेत्रातील अधिकारी तसेच युवा व्यावसायिकांसाठी विविध प्रगत (Advanced) प्रशिक्षण सत्रांची मालिका आयोजित करण्याचे नियोजन आहे. या प्रशिक्षणांमध्ये उद्योगांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारे विषय समाविष्ट आहेत. यात स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन, नेतृत्व विकास, भावनिक बुद्धिमत्ता, उत्पादकता व्यवस्थापन, ताण-तणाव व्यवस्थापन, नवोपक्रम आणि समस्या निराकरण यांचा समावेश आहे. एमआयटीच्या अॅडव्हान्स्ड ट्रेनिंग मॉड्यूल्समध्ये विशेषतः प्रभावी संवादकौशल्य, जागतिक पातळीवरील संवाद, डेटा आधारित निर्णयप्रक्रिया, तसेच बदलत्या औद्योगिक वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक कौशल्यांवर भर दिला जाईल. या मॉड्यूल्सद्वारे सहभागींच्या नेतृत्वक्षमतेत वाढ, निर्णयक्षमता सुधारणा आणि संस्थात्मक कार्यक्षमतेत वृद्धी साधण्याचा उद्देश आहे. या मालिकेतील पहिले सत्र “स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन अँड इन्फ्लुएन्स” या विषयावर गुरुवार, १६ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे. हे सत्र सीएमआयए हॉल, बजाज भवन, रेल्वे स्टेशन एमआयडीसी येथे दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत होईल. या प्रशिक्षण सत्राचे मार्गदर्शन एमआयटीचे व्यवस्थापन विभाग प्रमुख प्रा. सचिन लोमटे करणार आहेत. प्रभावी नेतृत्वासाठी आवश्यक असलेल्या संवादकौशल्यांवर यात विशेष भर दिला जाईल. सत्रामध्ये एथिकल पर्सुएशन व स्टोरीटेलिंग, कॉग्निटिव्ह बायस-अवेयर कम्युनिकेशन, क्रॉस-कल्चरल व ग्लोबल कम्युनिकेशन तसेच क्रायसिस कम्युनिकेशन व डेटा स्टोरीटेलिंग या महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश असेल. या उपक्रमाद्वारे मराठवाड्यातील उद्योगांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविण्यासाठी आवश्यक कौशल्यांचा विकास करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आयोजकांनी उद्योगांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
Source link
सीएमआयए-एमआयटीचा संयुक्त कौशल्य विकास उपक्रम सुरू:16 एप्रिल रोजी ‘स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन’ सत्राने होणार शुभारंभ