Headlines

'NEET' फेरपरीक्षेचाही पेपर फुटला?:आमदार रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, गुजरातमधून 3 दिवस आधीच पेपर फुटल्याचा दावा




देशात सध्या पेपरफुटीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, यातच आता आमदार रोहित पवार यांनी ‘नीट’ परीक्षेबाबत एक अत्यंत खळबळजनक आरोप केला आहे. ‘नीट’चा पेपर फुटल्यानंतर जी फेरपरीक्षा घेण्यात आली होती, तिचा पेपरही परीक्षेच्या तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटल्याचा दावा पवार यांनी एका ट्विटद्वारे केला आहे. जर ही गोष्ट खरोखरच सत्य असेल, तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने ही अत्यंत चिंताजनक आणि गंभीर बाब असल्याचेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले की, नीट पेपर लीक झाल्यानंतर जी नवीन फेरपरीक्षा घेण्यात आली त्या परीक्षेचा पेपर देखील 3 दिवस आधीच गुजरातमधून फुटल्याच्या बातम्या समोर येत आहेत. हे सत्य असेल तर खूप अवघड आहे. तपास यंत्रणांनी या संदर्भात त्वरित खुलासा करावा आणि पेपर फुटला असेल तर कुठल्याही दबावाला बळी न पडता यामागील रॅकेट उघडकीस आणावे, अशी विनंती पवारांनी केली आहे. तसेच त्यांनी यासोबत पेपरफुटी संदर्भात पुढे आलेले स्क्रीन शॉट, मेल, संभाषण या सगळ्याची एक लिंक देखील त्यांनी ट्विट केली आहे. आमदार रोहित पवार यांनी आपल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ काही कागदपत्रे आणि एक ईमेल ट्विट करत, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. देशात आधीच ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहारांवरून मोठे रणकंदन माजले असून, यावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर राजीनाम्याची वेळ ओढवली आहे. अशातच आता फेरपरीक्षेचा पेपरही फुटल्याचा नवा आरोप समोर आल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, पेपरफुटीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने 2024 च्या नव्या कायद्यात सुधारणा करून तो संसदेत मांडला आहे. सध्या संसदेत यावर जोरदार चर्चा सुरू असून, विरोधकांनी सरकारला या मुद्द्यावरून चांगलेच कोंडीत पकडले आहे. आता ‘नीट’च्या फेरपरीक्षेचा पेपरही फुटल्याचा दावा जर खरोखरच सिद्ध झाला, तर यावरून सर्व विरोधी पक्ष पुन्हा एकदा आक्रमक होऊन सरकारला धारेवर धरणार का, हा मोठा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा पुणे विद्यापीठात 3 लाखांत डिग्री?:हा सावित्रीबाई फुलेंच्या नावाचा अवमान, रोहित पवारांचा घणाघात; राज्यपालांकडे चौकशीची मागणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काही कर्मचाऱ्यांकडून लाखो रुपयांच्या मोबदल्यात बोगस पदव्या दिल्या जात असल्याच्या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. शिक्षणाच्या क्षेत्रासाठी हा अत्यंत धक्कादायक प्रकार असल्याचे सांगत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सविस्तर वाचा राज्यात 2 हजार शाळा बंद, पेपरफुटी सुरूच:शिक्षण व्यवस्थेवरून संजय राऊतांचा मोदी-शहांसह राज्य सरकारवर हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. “महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था पूर्णपणे रसातळाला गेली असून, राज्यात बोगस डिग्रीचा मोठा स्कॅम सुरू आहे,” असा आरोप राऊत यांनी केला आहे. पेपरफुटी, नवीन शाळांच्या मंजुरीतील भ्रष्टाचार आणि शिक्षकांना लावली जाणारी अवांतर कामे यावरून त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. तसेच, न्याय मागणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांना राज्याचे मुख्यमंत्री शिव्या घालत असल्याचा गंभीर दावाही त्यांनी यावेळी केला. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *