![]()
शहरातील वाढती लोकसंख्या, परराज्य व इतर जिल्ह्यांतून रोजगार, शिक्षण आणि व्यवसायासाठी होणारे स्थलांतर लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी भाडेकरू व घरमालकांच्या पडताळणीसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. घरमालकांनी भाडेकरूंची माहिती संबंधित पोलिस ठाण्यात ऑनलाइन अथवा प्रत्यक्ष सादर करणे बंधनकारक असून, नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर परराज्य व इतर जिल्ह्यांतील नागरिक वास्तव्यास येत असल्याने त्यांच्या पडताळणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यासाठी ‘भाडेकरू/पेईंग गेस्ट माहिती विनंती’ या सुविधेद्वारे घरमालकांनी भाडेकरूंची माहिती पोलिसांकडे नोंदविणे आवश्यक आहे. ही मोहीम विशेष शाखेच्या समन्वयातून शहरातील विविध पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांच्या सहभागाने राबविण्यात येत आहे. सर्वाधिक भाडेकरू असलेल्या परिसरांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन माहिती संकलित केली जात आहे. घरमालकांनी भाडेकरूंची माहिती दिली आहे का, तसेच संबंधित व्यक्तींची पडताळणी करण्यात आली आहे का, याची तपासणी केली जात आहे. माहिती न दिल्यास संबंधित घरमालकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. विशेष शाखेने दिलेल्या माहितीनुसार, 21 जुलै ते 28 जुलै 2026 या कालावधीत 71 घरमालक/भाडेकरूंवर कारवाईसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला असून, संबंधित प्रकरणे पुढील कार्यवाहीसाठी पोलिस ठाण्यांकडे पाठविण्यात आली आहेत. या मोहिमेमुळे शहरातील सुरक्षितता वाढविणे, संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवणे आणि गुन्हेगारीला आळा घालणे हा मुख्य उद्देश असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
Source link
पुणे पोलिसांची भाडेकरू पडताळणी मोहीम सुरू:माहिती न दिल्यास घरमालकांवर होणार कायदेशीर कारवाई