![]()
पुणे महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ९६७ कोटी रुपयांच्या भूमिग्रीन निविदा प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांना पत्र लिहून पुणे महापालिकेतील कथित भ्रष्टाचारावर गंभीर आरोप केले आहेत. ‘देवाभाऊंचा निरोप आहे’ हे वाक्य आता भ्रष्टाचाराचे कोडवर्ड बनल्याचा आरोप करत, संघाने भाजपच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे की, पुणे महापालिकेतील अनेक निर्णयांमध्ये ‘मुंबईतील देवाभाऊंचा निरोप आहे’ असे सांगून नियमांना बगल दिली जात आहे. या नावाखाली आर्थिक गैरव्यवहार, निविदांमध्ये कथित फेरफार आणि सार्वजनिक पैशांची उधळपट्टी सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागातील निविदा क्रमांक ३/२०२६-२७ संदर्भात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आमदार योगेश टिळेकर यांचा वरदहस्त असल्याचा आरोप असलेल्या भूमिग्रीन कंपनीला पात्र ठरवण्यासाठी निविदेतील अटी आणि पात्रता निकष बदलण्यात आल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. महापालिकेच्या दक्षता विभागाने लेखी आक्षेप नोंदवूनही ते धुडकावून लावत निविदा प्रक्रिया पुढे रेटण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यासाठी सभागृह नेत्यांच्या मर्जीतील अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगत, संपूर्ण प्रक्रियेत प्रशासकीय दबाव, आर्थिक प्रभाव आणि घाईगडबडीचे चित्र असल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. शिंदे यांच्या मते, सुरुवातीला सुमारे ४०० कोटी रुपयांचे असलेले हे काम प्रथम जवळपास ७०० कोटींपर्यंत नेण्याचा प्रयत्न झाला. काँग्रेसने विरोध केल्यानंतर प्रस्ताव मागे घेण्यात आला. त्यानंतर नव्याने निविदा काढून अखेरीस तब्बल ९६७ कोटी रुपयांपर्यंत हा खर्च पोहोचवण्यात आला. जर या निविदेनुसार भूमिग्रीनला कार्यादेश देण्यात आला, तर पुणेकरांच्या खिशावर सुमारे ५६७ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. पत्रातील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे ‘देवाभाऊंचा निरोप आहे’ या वाक्यावर केलेला थेट हल्ला. हे वाक्य आता भ्रष्टाचाराचा राजमार्ग आणि पासवर्ड बनले असून, त्याच आधारावर रस्ते, पाणीपुरवठा, नदी सुधारणा, गटारे, कचरा व्यवस्थापन आणि विविध विकासकामांमध्ये कथित भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजप नेत्यांवर थेट निशाणा भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, महापौर मंजुषा नागपूरे, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, सभागृह नेते गणेश बिडकर, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावरही पत्रातून थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. भूमिग्रीन प्रकरणाची माहिती असूनही अनेकांनी मौन बाळगल्याचा आरोप करत, हे मौन नैतिकदृष्ट्या समर्थनीय आहे का, असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
Source link
पुणे महापालिकेत 967 कोटींचा कचरा घोटाळा:'देवाभाऊंचा निरोप' भ्रष्टाचाराचा पासवर्ड; काँग्रेसचे सरसंघचालकांना पत्र