![]()
एकीकडे शासन स्तरावर मोठ्या थाटामाटात वृक्षारोपणाची उद्दिष्टे निश्चित करून कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना दुसरीकडे प्रत्यक्ष शेवगाव परिसरात मात्र मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. वनविभागाचे दुर्लक्ष, गस्तीचा अभाव आणि सागवान लाकडाची दिवसाढवळ्या होणारी वाहतूक यामुळे वनविभागाच्या एकूणच कार्यक्षमतेवर आणि भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पावसाळा हा झाडे, वेली आणि वनसंपदा फुलण्याचा अन् वाढण्याचा काळ मानला जातो. मात्र, याच काळात शेवगाव आणि परिसरात बेसुमार वृक्षतोड होत आहे. हिरवीगार झाडे तोडली जात असल्याने पर्यावरणप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. “शासकीय पातळीवर कागदावर झाडे लावण्याचे टार्गेट दिले जाते पण दुसरीकडे डोळ्यांदेखत होणाऱ्या वृक्षतोडीकडे डोळेझाक केली जाते, असा थेट आरोप स्थानिकांनी केला आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, वनविभागाचे कर्मचारी आणि अधिकारी प्रत्यक्ष क्षेत्रात उतरून नियमित पाहणी अथवा गस्त करताना दिसत नाहीत. वन कर्मचाऱ्यांचे काम केवळ कार्यालयीन कामकाजापुरते आणि बिबट्याची माहिती आल्यास तेवढ्यापुरतेच मर्यादित राहिल्याची टीका होत आहे. त्यामुळे वनविभाग वृक्षतोड करणाऱ्यांचे आणि अवैध लाकूड व्यावसायिकांचे धाडस वाढले आहे. पाथर्डी-शेवगाव रस्त्यावर दिवसाढवळ्या सागवान वाहतुकीबरोबर इतर लाकडांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होताना दिसत आहे. शहरातून आणि पाथर्डी-शेवगाव मार्गावरून भर दिवसा टेम्पोमधून जाळे लावून लाकडाची वाहतूक सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शहरातील सॉ मिलमध्ये सध्या लाकडाचा प्रचंड साठा दिसून येत आहे. हा संपूर्ण व्यवसाय नेमका कोणाच्या आशीर्वादाने आणि आश्रयाने सुरू आहे असा सवाल नागरिक विचारत आहेत. नागरिकांच्या अन् पर्यावरणप्रेमींच्या मागण्या असून सखोल चौकशी व कारवाई करून अवैध वृक्षतोड आणि सागवान लाकडाच्या वाहतुकीची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे. वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी कार्यालयात न बसता परिसरात तातडीने नियमित गस्त सुरू करावी. शेवगाव मार्गे लाकूड वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करून कागदपत्रांची पडताळणी करावी. वनसंपदेचे रक्षण करण्यात अपयशी ठरलेल्या किंवा दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून या भागात कार्यक्षम व सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. दरम्यान, यासंदर्भात पाथर्डी वनपरिक्षेत्राचे अधिकारी मिलिंद गोवेकर यांच्याशी अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपला भ्रमणध्वनी उचलला नसल्याने त्यांचे काय म्हणणे आहे हे समजू शकले नाही. वृक्षतोडीसंदर्भात तातडीने चौकशी व्हावी ^ वनविभागाचे प्रमुख अकार्यक्षम आहेत व वृक्षतोडीमुळे पर्यावरण धोक्यात येत आहे. या वृक्षतोडी संदर्भात तत्काळ चौकशी होऊन कारवाई व्हावी अशी अपेक्षा आहे. -बाळासाहेब फटांगडे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेवगाव
Source link
शेवगावात बेसुमार वृक्षतोडीने पर्यावरणाचे आरोग्य धोक्यात:सागवानाच्या लाकडाचीही होतेय वाहतूक, वनविभागाचे मात्र दुर्लक्ष