Headlines

रक्षा खडसेंचा राजीनामा घ्या, दुहेरी भूमिका चालणार नाही!:विजय चौधरी आणि गिरीश महाजन यांच्या कथित ऑडिओ क्लिपने राजकीय भूकंप; एकनाथ खडसे आणि रोहित पवारांची टीका




भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्यातील एका कथित ऑडिओ क्लिपने सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या क्लिपमध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या सूनबाई व केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आल्याचे ऐकू येत असून, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची थेट मागणी करण्यात आली आहे. या प्रकारानंतर राजकीय वर्तुळातून संतापाची लाट उसळली असून, भाजपमधील अंतर्गत गटबाजी व खडसे-महाजन यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या ऑडिओ क्लिपनंतर वाढता विरोध आणि पक्षाची बदनामी टाळण्यासाठी विजय चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये नेमके काय आहे? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या कथित संभाषणात विजय चौधरी हे मंत्री गिरीश महाजन यांच्याशी बोलत असल्याचे सांगण्यात येत आहे. कथितरीत्या चौधरी म्हणतात, “एकनाथ खडसे आणि त्यांची मुलगी (रोहिणी खडसे) नेहमीच भाजपवर आणि तुमच्यावर घाणेरडे आरोप करत टीका करतात. आपण मात्र त्यांच्या घरात रक्षा खडसेला मंत्री बनवून ठेवले आहे. हे आता थांबले पाहिजे. हिची हकालपट्टी केली पाहिजे.” “सगळे एकाच घरात राहतात आणि एकमेकांना मदत करतात. अशी दुहेरी भूमिका चालणार नाही. रक्षा खडसे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे,” अशी आक्रमक मागणी चौधरी करताना दिसतात. या संपूर्ण संभाषणात कथितरीत्या मंत्री गिरीश महाजन हे चौधरी यांना न रोखता शांतपणे ‘हम्म… हम्म…’ म्हणत ऐकून घेत असल्याचे दिसत आहे. ही भाजपची संस्कृती का?, एकनाथ खडसेंची संतप्त प्रतिक्रिया या व्हायरल क्लिपवर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना भाजपच्या संस्कृतीवर आणि गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, “विजय चौधरी यांच्यासारख्या लोकांमुळे भाजपची प्रतिमा खराब होत आहे. ते गेल्या 25-30 वर्षांपासून दारूच्या धंद्यात असून नंदुरबारमध्ये त्यांचे कुटुंब दारूमाफिया म्हणून ओळखले जाते. केवळ पैसे खर्च करतात म्हणून भाजपने त्यांना सरचिटणीस केले. जुनी भाजप आणि आताची भाजप यात खूप फरक आहे. महिलांविषयी अत्यंत अर्वाच्य व घाणेरडे शब्द वापरले जात असताना एखाद्या सुसंस्कृत मंत्र्याने ताबडतोब थांबवले असते. पण महाजनांनी ते शांतपणे ऐकून घेतले. एकाच घरात दोन वेगळ्या पक्षांत असण्याची अनेक उदाहरणे आहेत (उदा. नारायण राणेंचे घर). रक्षा खडसे किंवा स्थानिक महिलांबद्दल अपशब्द वापरल्याची ही क्लिप मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवून तक्रार करणार आहे,” असे खडसे म्हणाले. पार्टी विथ डिफरन्स की पाताळयंत्री?; रोहित पवारांचे ट्विट्समधून शरसंधान राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावरून सलग तीन ट्विट करत भाजपला धारेवर धरले आहे. “पुरोगामी महाराष्ट्रात ‘लाडकी बहीण’ असलेल्या स्वपक्षाच्या एका महिला मंत्र्याबाबत भाजपचे लोक किती ‘सुसंस्कृत’ भाषा वापरतात, हे यातून स्पष्ट होते. मित्रपक्षांना संपवणारी भाजप स्वतःच्या महिला नेत्यांविरोधातही कसे कटकारस्थान रचते, याचा हा उत्तम नमुना आहे.” “क्लिपमध्ये एका माजी खासदार महिलेच्या घरात पिंपात पैसे भरून ठेवल्याचा उल्लेख ऐकू येतो. जर यांच्या घरात इतके पैसे असतील, तर मंत्र्यांच्या घरात किती घबाड असेल? ईडीच्या अधिकाऱ्यांनी विरोधकांमागे लागण्याऐवजी इकडेही थोडे लक्ष द्यावे,” असा टोला त्यांनी लगावला. रोहित पवार एका ट्विटमध्ये म्हणाले, “विजय चौधरी यांचा राजीनामा झाल्याने या क्लिपच्या सत्यतेला दुजोराच मिळाला आहे. पण महिलेला शिवीगाळ होत असताना ज्या मंत्र्याने त्यांना अडवले नाही, त्या मंत्र्याचे (गिरीश महाजन) काय? भाजप यावर उत्तर देणार का?” असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. विजय चौधरींचा राजीनामा! प्रकरण अंगाशी येत असल्याचे आणि पक्षाची जाहीर बदनामी होत असल्याचे पाहून विजय चौधरी यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे आहे. “माझ्यामुळे पक्षाची बदनामी होऊ नये म्हणून मी राजीनामा देत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले असले, तरी या प्रकरणामुळे महायुतीमधील राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. हेही वाचा.. धनुष्यबाण कुणाचा?: शिवसेना नाव आणि चिन्हाच्या वादावर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह कोणाचे, या गेल्या तीन वर्षांपासून गाजत असलेल्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने फेब्रुवारी 2023 मध्ये शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून आज न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. सकाळी 11 नंतर सुनावणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आजच्या सुनावणीत न्यायालय पुढील सुनावणीचा आराखडा ठरवते की युक्तिवादाला सुरुवात करते, याकडे सर्वांचे लक्ष असेल. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *