Headlines

महायुतीत सत्तेचा वाटा मिळत नसल्याची रामदास आठवलेंची खंत:म्हणाले, ‘शरद पवारांनी 7 विधान परिषद जागा दिल्या, भाजपसोबत 12 वर्षांत एकही नाही’




रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाला महायुतीमध्ये अपेक्षित राजकीय वाटा मिळत नसल्याची खंत केंद्रीय राज्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. पक्षाची संघटनात्मक ताकद मोठ्या पक्षांच्या तुलनेत कमी असली, तरी महायुतीतील घटक पक्षांनी रिपब्लिकन पक्षाला सत्तेत योग्य प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. विधान परिषदेची किमान एक जागा रिपब्लिकन पक्षाला मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करत आठवले यांनी आपल्या पूर्वीच्या राजकीय आघाडीची आठवण करून दिली. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील आघाडीसोबत असताना रिपब्लिकन पक्षाला विधान परिषदेच्या 7 जागा देण्यात आल्या होत्या. मात्र, 2014 पासून भाजपसोबत महायुतीत असूनही पक्षाला एकही विधान परिषद जागा मिळालेली नाही, असा दावा त्यांनी केला. आठवले म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आणण्याचा प्रयत्न यापूर्वी झाला आहे. 2012 मध्ये आम्ही एकत्र येऊन महायुती केली होती. सध्याच्या महायुतीतील सर्व घटक पक्षांनी रिपब्लिकन पक्षाला योग्य न्याय देण्याची गरज आहे. सत्तेत वाटा, मंत्रिपद आणि विधान परिषदेतील प्रतिनिधित्व या बाबतीत पक्षाला संधी मिळायला हवी. ‘आमच्यावर अन्याय होतोय असं नाही, पण सत्तेत वाटा हवा’ रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना मित्रपक्षांवर अवलंबून राहण्याची परिस्थिती निर्माण होऊ नये, असेही आठवले यांनी म्हटले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला अपेक्षित जागा मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सत्तेतील विविध पदांवरही पक्षाला पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही रिपब्लिकन पक्षाला जागा मिळाल्या नसल्याचा उल्लेख आठवले यांनी केला. मुंबई महापालिका निवडणुकीतही पक्षाला एकही जागा मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या परिस्थितीला ‘अन्याय’ असे संबोधण्याऐवजी महायुतीतील मोठ्या पक्षांनी रिपब्लिकन पक्षाला सत्तेत वाटा द्यावा, अशी आपली मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘सर्व रिपब्लिकन पक्ष एकत्र आले तर ताकद वाढेल’ रिपब्लिकन चळवळीतील विविध पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचेही रामदास आठवले यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला मजबूत राजकीय पक्ष उभा करण्यात आपण अद्याप यशस्वी झालो नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सर्व रिपब्लिकन पक्ष एकत्र आले, विविध सामाजिक घटक पक्षासोबत जोडले गेले आणि सर्वधर्मीय समाजाचा सहभाग वाढला, तर रिपब्लिकन पक्षाची राजकीय ताकद मोठ्या प्रमाणात वाढू शकते, असे आठवले यांनी म्हटले. निवडणूक आयोगाच्या आंदोलनावरही आठवलेंची भूमिका दरम्यान, निवडणूक आयोगाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनावरही रामदास आठवले यांनी भूमिका मांडली. निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, मतदार याद्यांमधून अनेक नागरिकांची नावे वगळली गेल्याच्या तक्रारींकडे निवडणूक आयोगाने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मतदार यादीतून वगळण्यात आलेली पात्र मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करण्यासाठी आयोगाने प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देण्याची आवश्यकता नसल्याचेही आठवले यांनी स्पष्ट केले. अभिजित दीपके यांना आठवलेंचा सल्ला यावेळी अभिजित दीपके यांच्या राजकीय भूमिकेवरही रामदास आठवले यांनी भाष्य केले. अभिजित दीपके हे अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाशी संबंधित असल्याचे सांगत त्यांनी दीपके यांनी आपमध्ये प्रवेश करावा, असा सल्ला दिला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह किंवा शिवराळ भाषा वापरू नये, असेही आठवले यांनी म्हटले. राजकीय मतभेद असले तरी भाषेची मर्यादा राखली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान, 2026 मध्ये महाराष्ट्रातून झालेल्या राज्यसभा निवडणुकीत रामदास आठवले यांच्यासह महायुतीचे सहा आणि महाविकास आघाडीचे एक असे सातही उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. हेही वाचा… सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवारांचा पुरुषोत्तम जगतापांना इशारा:‘अजितदादांचं नाव वापरायचं आणि कुटुंबाला बदनाम करायचं, हे चालणार नाही’ बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते श्री सोमेश्वर मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी त्यांनी कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आणि बंडखोरी करत स्वतंत्र पॅनल उभे केलेले पुरुषोत्तम जगताप यांच्यावर थेट निशाणा साधला. अजित पवारांचे नाव आणि फोटो वापरून निवडणूक लढवू नये, तर स्वतःच्या कर्तृत्वावर निवडणूक लढवावी, असा स्पष्ट इशारा सुनेत्रा पवार यांनी दिला. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *