Headlines

उधारीच्या वादाचे रक्तरंजित पर्यवसान; शेंद्रेत तरुणाचा खून:खोऱ्याने डोक्यात घाव; भाड्याने राहणाऱ्या दोघा भावांना पोलिसांनी घेतले ताब्यात




जुन्या उधारीच्या पैशांवरून सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान शेंद्रे (ता. सातारा) येथे रक्तरंजित हल्ल्यात झाले. सौरभ बाळू भिसे (वय २९) या युवकाच्या डोक्यात खोऱ्याने घाव घालून त्याचा खून करण्यात आला. शनिवारी घडलेल्या या घटनेने शेंद्रे परिसरात खळबळ उडाली. घटनेनंतर सातारा तालुका पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत प्रमोद किसन जाधव व प्रताप किसन जाधव या दोघा भावांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सौरभ भिसे आणि प्रमोद जाधव यांच्यात जुन्या उधारीच्या पैशांवरून वाद होता. गणेशोत्सवाच्या काळातही या कारणावरून दोघांमध्ये कचाकची झाली होती. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात धुसफूस सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे.
शनिवारी उधारीच्या पैशांवरून पुन्हा वाद झाला. त्यावेळी वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. प्रमोद जाधव याने हातातील खोऱ्याने सौरभच्या डोक्यात प्रहार केल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. यावेळी प्रताप जाधव याचाही हल्ल्यात सहभाग असल्याचे तपासात पुढे आले आहे. डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने सौरभचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सातारा उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक विपुल पाटील आणि तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक निलेश तांबे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. तसेच हल्ल्यात वापरलेल्या वस्तूसह अन्य पुरावे संकलित करण्याचे काम सुरू केले.
दरम्यान, गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने संशयितांचा शोध सुरू केला. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत प्रमोद व प्रताप जाधव या दोघांना ताब्यात घेतले. दोघेही मूळचे तारळे (ता. पाटण) येथील रहिवासी असून, सध्या शेंद्रे येथे भाड्याने राहत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या हल्ल्यामागे केवळ उधारीचा वाद होता की त्यामागे अन्य कारणेही आहेत, गेल्या आठवडाभरातील वादाची पार्श्वभूमी काय होती आणि या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास तालुका पोलिसांकडून सुरू आहे. संशयितांच्या चौकशीनंतर खुनामागील नेमके कारण आणि घटनेचा अधिक तपशील स्पष्ट होण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *