![]()
एखाद्या क्षणाला कॅमेऱ्यात बंदिस्त करणारी एक ‘क्लिक’ किती व्यापक आशय व्यक्त करू शकते, किती प्रश्न उपस्थित करू शकते आणि किती विचार करायला भाग पाडू शकते, याची प्रचिती पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील वृत्तपत्र छायाचित्रकारांनी टिपलेल्या छायाचित्रांच्या प्रदर्शनातून येत आहे, असे मत ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केले. अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वर्तमानपत्रांच्या छायाचित्रकारांनी काढलेल्या फोटोंचे प्रदर्शन प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्धाटन शनिवारी मंगेशकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रम बगाडे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष किशोर बरकले, कार्यकारिणी सदस्य तुषार झरेकर, मिलिंद शुक्ल, महापालिकेचे विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि पत्रकार यावेळी उपस्थित होते. उद्घाटनानंतर हृदयनाथ मंगेशकर यांनी प्रदर्शनातील छायाचित्रांची पाहणी केली. प्रत्येक छायाचित्रांमागील आशय आणि त्यातून व्यक्त होणाऱ्या भावना यांचे त्यांनी कौतुक केले.
या प्रदर्शनात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील विविध वर्तमानपत्रांमध्ये कार्यरत असलेल्या छायाचित्रकारांनी टिपलेल्या विविध घटनांचे, भावविश्वाचे, सामाजिक वास्तवाचे आणि शहराच्या बदलत्या स्वरूपाचे दर्शन घडवणाऱ्या छायाचित्रांचा समावेश आहे. हे प्रदर्शन ३ ते ९ ऑक्टोबरपर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे.
Source link
एका क्लिकने विचार करायला लावणारी छायाचित्रे: हृदयनाथ मंगेशकर:पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि महापालिकेचा संयुक्त उपक्रम, 9 ऑक्टोबरपर्यंत खुले