![]()
अमरावती जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून अधूनमधून पाऊस सुरू असला तरी, त्यापूर्वीच्या आठवडाभराच्या उघडीपमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जुलैच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर वार्षिक सरासरी गाठण्याच्या जवळ पोहोचलेले पर्जन्यमान पुन्हा खाली घसरले असून ते ७२.६ टक्क्यांवर आले आहे. यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यातही घट झाली आहे. जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या मोर्शी तालुक्यातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा (सिंभोरा) धरणातील जलसाठा गतवर्षीच्या तुलनेत सुमारे ४.५५ टक्क्यांनी कमी झाला आहे. यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या सिंचनाची मोठी समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. १ जून ते ३० जुलै २०२६ या कालावधीत जिल्ह्यात ३२७.४ मिलीमीटर पाऊस अपेक्षित होता. मात्र, गुरुवारपर्यंत प्रत्यक्षात ३००.७ मिलीमीटर पाऊस झाला आहे, ज्यामुळे सरासरी ७२.६ टक्क्यांवर थांबली आहे. अचलपूर (५१.९ टक्के) आणि भातकुली (५६.७ टक्के) तालुक्यांमध्ये पावसाची परिस्थिती सर्वाधिक चिंताजनक आहे. सिंभोरा धरणातील जलसाठा गतवर्षी याच तारखेला ५६.८६ टक्के होता, जो यावर्षी ५२.३१ टक्क्यांवर आला आहे. गतवर्षी धरणात ३८७.०८ दशलक्ष घनमीटर (दलघमी) पाणी होते, तर यावर्षी ते २९५.०७ दलघमीवर थांबले आहे. अमरावतीसह सीमेपलीकडील जिल्ह्यात मोठ्या पावसाची सर न आल्याने अप्पर वर्धा धरणात अद्याप अपेक्षित आवक झालेली नाही, असे जलसंपदा विभागाने म्हटले आहे. यामुळे आगामी काळात ग्रामीण व शहरी भागांत पाणीटंचाईची झळ बसू शकते. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने आतापासूनच आवश्यक तयारी सुरू केली आहे. अप्पर वर्धा धरणातील जलसाठा पिण्याचे पाणी, सिंचन आणि उद्योग अशा तिन्ही कारणांसाठी वापरला जातो. त्यामुळे कोणत्या कारणासाठी किती पाणी आरक्षित ठेवावे, याची गणिते आखायलाही या विभागाने सुरुवात केली आहे. जुलै महिन्यात सुरुवातीला झालेल्या पावसानंतर अमरावती जिल्ह्यातील बहुतांश भागांत कोळपणी, निंदण आणि खत व्यवस्थापनाची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढल्याने शेतातील ओलावा संपत आला आहे. सोयाबीन, कापूस, तूर या मुख्य पिकांसह मूग, उडीद या पिकांना आता तातडीने मोठ्या पावसाची गरज आहे. पाऊस असाच लांबल्यास पिकांची वाढ खुंटून उत्पादनात मोठी घट येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ऑगस्ट महिना उजाडत आला तरी जोरदार पावसाची अजूनही प्रतीक्षाच आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसांत दमदार पुनरागमन न केल्यास अमरावती जिल्ह्यावर पीक नुकसान आणि पाणीटंचाईचे सावट गडद होण्याची भीती वर्तवली जात आहे.
Source link
अमरावती जिल्ह्यात पाऊस कमी, सरासरीच्या 72% पर्जन्यमान:मोर्शी धरणात 4.5% जलसाठा कमी, पाणीटंचाईची भीती