![]()
कोल्हापूर जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा करवीर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कदमवाडी रोडवरील “प्रतिमा हॉस्पिटल’वर पोलिसांनी छापा टाकून डॉ. चंद्रकांत गायकवाड याच्या मुसक्या आवळल्या आहेत. प्राथमिक चौकशीत या डॉक्टरने आतापर्यंत २०० ते २५० बेकायदेशीर गर्भपात केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. विशेष म्हणजे, डॉ. गायकवाड याने यापूर्वी विविध जिल्ह्यांत सिव्हिल सर्जन आणि मुंबईच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये अतिरिक्त अधीक्षक म्हणून काम केले आहे. शासकीय सेवेत मोठ्या पदांवर राहिलेल्या डॉक्टरचे हे काळे धंदे समोर आल्याने वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. असा रचला पोलिसांनी सापळा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या निर्देशानुसार २६ जुलै रोजी कळंबा येथील श्री स्टार लॉजवर कारवाई करण्यात आली होती. तिथे स्वप्निल पाटील हा बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी करताना आढळला होता. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश देण्यात आले होते. सोनोग्राफी मशीन, औषधे जप्त हॉस्पिटलमधून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, गर्भपाताची औषधे आणि वैद्यकीय उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, अटकेची कारवाई सुरू असतानाच डॉ. गायकवाड याची प्रकृती बिघडल्याने त्याला कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अशी आहे शिक्षेची तरतूद पीसीपीएनडीटी कायदा हा भारतातील स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी आणि बाल लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी लागू करण्यात आलेला आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास डॉक्टर, लॅब मालक आणि लिंग तपासणीची मागणी करणारे पालक किंवा नातेवाईक यांना पहिल्यांदा गुन्हा सिद्ध झाल्यास ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि १०,००० पर्यंत दंड होतो, तर दुसऱ्यांदा किंवा वारंवार गुन्हा केल्यास ५ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि ५०,००० ते १,००,००० पर्यंत दंडाची तरतूद आहे. पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, गर्भपातासाठी वापरली जाणारी औषधे जप्त या प्रकरणातील आरोपी अश्विनी शिंदे हिची चौकशी केली असता, गर्भात मुलगी असलेल्या महिलांचे गर्भपात प्रतिमा हॉस्पिटलमध्ये केले जात असल्याचे उघड झाले. पोलिसांनी खातरजमा करण्यासाठी एक डमी महिला रुग्ण हॉस्पिटलमध्ये पाठवली. डॉ. गायकवाड याने कसलीही नोंद न करता पोर्टेबल सोनोग्राफी मशीनवर तपासणी केली. तो गर्भपाताच्या गोळ्या देऊन बेकायदेशीर गर्भपात करण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी छापा टाकला.
Source link
भंडाफोड:कोल्हापुरात डॉक्टरने केले 200 हून अधिक बेकायदेशीर गर्भपात, डमी रुग्णाच्या साहाय्याने उघडकीस आला प्रकार