![]()
आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणात विठ्ठलनामाचा गजर सुरू असतानाच बेल्हेकरांना समाजाला विचार करायला लावणारा संदेशही अनुभवायला मिळाला. येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दिंडीच्या माध्यमातून ‘नीट’ परीक्षा पेपरफुटी आणि अन्नभेसळ या ज्वलंत सामाजिक विषयांवर प्रभावी पथनाट्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यात परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेचे महत्त्व, प्रामाणिकपणे शिक्षण घेण्याची गरज तसेच पेपरफुटीसारख्या गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होणारे गंभीर परिणाम प्रभावीपणे मांडण्यात आले. त्याचबरोबर अन्नभेसळीमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, सुरक्षित व दर्जेदार अन्नाची निवड करण्याची आवश्यकता आणि भेसळ रोखण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचा संदेशही विद्यार्थ्यांनी दिला. दिंडीत विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत जनाबाई, संत चोखामेळा आणि संत एकनाथ यांच्या वेशभूषा साकारत वारकरी परंपरेचे आकर्षक दर्शन घडविले. भक्तिमय वातावरणात बसस्थानक परिसरात बडू गटकळ यांच्या हस्ते विठ्ठलाची आरती करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी फड तसेच बेल्हे ग्रामपंचायतीतील सदस्य व कर्मचाऱ्यांना शुभेच्छापत्रे देऊन सन्मानित केले. त्यामुळे दिंडीला भक्तीसोबत सामाजिक संवेदनशीलतेचीही जोड मिळाली. या उपक्रमात माळशेज निकेतनचे संस्थापक अध्यक्ष सीए सावकार गुंजाळ, संचालक गणेश गुंजाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश ढवळे, विश्वस्त दावला कणसे, प्राचार्या विद्या गाडगे, उपप्राचार्य के. पी. सिंग आदी सहभागी झाले. भक्ती, संस्कार आणि समाजजागृती यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या उपक्रमाचे बेल्हे परिसरात कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांनी दिलेला ‘प्रामाणिक शिक्षण आणि भेसळमुक्त समाज’ हा संदेश उपस्थितांच्या मनावर ठसा उमटवून गेला.
Source link
विठ्ठलाच्या नामगजरात पेपरफुटी अन् अन्नभेसळीवर प्रहार:बेल्हेतील मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे पथनाट्य