![]()
शनिशिंगणापूर येथील जगप्रसिद्ध शनैश्वर देवस्थानच्या कारभारात गंभीर गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारींनंतर शासनाने प्रत्यक्ष कारवाई सुरू केली आहे. जुलै २०२५ मध्ये आमदारांनी विधिमंडळात आवाज उठवल्यानंतर आणि २२ सप्टेंबर २०२५ रोजी तत्कालीन विश्वस्त मंडळ बरखास्त केल्यानंतर, आता मुंबईचे विशेष फॉरेन्सिक पथक चौकशीसाठी शनिशिंगणापुरात दाखल झाले आहे. देवस्थानच्या कारभारात मागील काही वर्षांत अनेक अनियमितता समोर आल्या होत्या. अनावश्यक असताना तब्बल २,३०० कर्मचाऱ्यांची झालेली नोकरभरती, अॅप्स घोटाळा, आर्थिक गैरव्यवहार, तेढ निर्माण करणारे वाद, चौथऱ्यावरील वाद आणि उपकार्यकारी अधिकाऱ्यांची आत्महत्या यांसारख्या घटनांमुळे देवस्थान प्रशासनावर गंभीर आरोप झाले होते. या पार्श्वभूमीवर मुंबईहून आलेले फॉरेन्सिक पथक देवस्थानच्या २०२० ते २०२५ या पाच वर्षांतील कारभाराची झाडाझडती सुरु केली आहे. हे पथक आर्थिक व्यवहार, निधीचा वापर, खरेदी प्रक्रिया, करार, मंजुरी, लेखा नोंदी आणि वैधानिक कागदपत्रांची सखोल फॉरेन्सिक पडताळणी करत आहे. भविष्यातील कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी हे विशेष लेखापरीक्षण सुरू असल्याचे कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी सांगितले. फौजदारी कारवाई होण्याची शक्यता स्थानिक आमदारांचा पुढाकार आणि पावसाळी अधिवेशनातील विरोधानंतर मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचाराविरोधात कडक इशारा दिला होता. विश्वस्त मंडळ बरखास्तीनंतर ही चौकशी सुरू झाली आहे. फॉरेन्सिक अहवालात अनियमितता सिद्ध झाल्यास दोषी विश्वस्त व अधिकाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल होऊन कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.
Source link
शनिशिंगणापूर:देवस्थानच्या 5 वर्षांतील व्यवहारांची फॉरेन्सिक चौकशी सुरू