Headlines

जळगावच्या चोपड्यात मुसळधार पावसाचा तडाखा:रत्नावतीसह नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागली, वीजपुरवठा खंडित




चोपडा तालुक्यात गुरुवारी पहाटेपासून ते मध्यरात्रीच्या पावसाने चांगली बॅटिंग करून सर्वत्र तालुका ओलाचिंब केला आहे. अखंडपणे सुरू असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण तालुका अक्षरशः झोडपून निघाला आहे. ३० जुलैच्या मध्यरात्रीत ३१ जुलैच्या पहाटेपर्यंत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरासह ग्रामीण भाग जलमय झाला. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले, तर लहान-मोठे नाले आणि नद्यांना पूर आल्याने जनजीवन काही काळ विस्कळीत झाले. यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसाने मोठा दिलासा दिला आहे. मका, कापूस, केळी, ऊस,सोयाबीन, तूर, बाजरी आदी पिकांसाठी हा पाऊस लाभदायक ठरणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. जमिनीतील ओलावा वाढल्याने पिकांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे. रत्नावती नदीला पहिला पूर मुसळधार पावसामुळे चोपडा शहरातील रत्नावती नदीला आज पहिलाच पूर आला होता. तसेच तालुक्यातील अनेक नद्या आणि ओढ्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. काही ठिकाणी नाल्याना मोठा पूर असल्याने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आजच्या या पुरामुळे रत्नावती नदी मधील मोठ्या प्रमाणात असलेली घाण मात्र साफ झाली आहे. वीज गुल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला, तरी पहाटे सुमारे ३ वाजल्यापासून अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, घरगुती कामे तसेच व्यापारी व्यवहारांवर त्याचा परिणाम झाला.तालुक्यात संततधार पाऊस असला तरी कुठेही वादळ वारा नसताना देखील चोपडा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात वीज मात्र गुल होती.चोपडा शहरात साडे सात वाजता काही मिनिटे लाईट आली आणि परत गेली होती. ग्रामीण भागात महावितरणकडून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे, सततच्या पावसामुळे शेतातील मशागतीची आणि फवारणीची कामे काही काळ थांबण्याची शक्यता आहे. तण वाढण्याची भीतीही शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून पावसाची उघडीप मिळाल्यानंतर शेतीकामांना पुन्हा वेग येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दमदार पाऊस शेतीसाठी वरदान एकंदरीत, चोपडा तालुक्यात झालेला हा दमदार पाऊस शेतीसाठी वरदान ठरला असून पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. मात्र नदी-नाल्यांजवळ जाणे टाळावे, पूरग्रस्त भागात आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. चोपडा शहरातील अनेक नगर तसेच कॉलनी भागात सततच्या पावसाने रस्ते खराब असल्याने प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी तातडीने सर्व समस्याकडे लक्ष घालण्याची मागणी शहर वाशियाकडून होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *