Headlines

श्रीरामपूर-बेलापूर मार्गावर पुन्हा सुरू झाली वृक्षलागवड:‘दिव्य मराठी’च्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग, वृक्षप्रेमींमध्ये समाधान, मात्र झाडे जगवण्याचे आव्हान‎




अरुंद रस्ता आणि वाढती वाहतूक यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी श्रीरामपूर-बेलापूर राज्य मार्ग क्रमांक ३६ हा सहा किलोमीटरचा रस्ता चौपदरी करणे आवश्यक होते. मात्र, या रस्ता रुंदीकरणादरम्यान वडाच्या जुन्या झाडांसह शेकडो झाडे तोडली गेली. त्यानंतर प्रशासनाने झाडे लावली खरी, परंतु पाणीटंचाई व दुर्लक्षामुळे रखरखत्या उन्हात ती सर्व झाडे जळून खाक झाली होती. या गंभीर प्रकाराबाबत ‘दिव्य मराठी’ने ७ जून रोजीच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला होता. अखेर या वृत्ताची दखल घेत आता पावसाळा सुरू होताच प्रशासनाने या रस्त्याच्या दुतर्फा पुन्हा वृक्षलागवडीस सुरुवात केल्याने वृक्षप्रेमींमधून समाधान व्यक्त होत आहे. झाडे तोडण्यास विरोध करणाऱ्यांवर नेहमीच ‘विकासविरोधी’ असल्याचा शिक्का मारला जातो. रस्ते रुंदीकरणासाठी तोडलेल्या झाडांच्या बदल्यात नेमकी किती झाडे लावली? हा मोठा प्रश्न आहे. मुळात पर्यावरण आणि विकास हे परस्परविरोधी नसून परस्परपूरक आहेत. मात्र, वाढते रस्ता रुंदीकरण, शहरीकरण आणि औद्योगिकीकरणात पर्यावरण रक्षणाचे महत्त्व विसरले जात आहे. श्रीरामपूर-बेलापूर रस्ता रुंदीकरणात अनेक झाडे तोडण्यात आली. लोकभावना, वृक्षप्रेमी तरुण आणि वृत्तपत्रांच्या दणक्यामुळे शेवटी एका वडाचे जुने झाड कसेबसे वाचले; परंतु इतर झाडांचे कायदेशीर प्रत्यारोपण करणे आवश्यक असतानाही ते झाले नाही. नेहमीच दुष्काळात झाडांची आठवण होते आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला वृक्षारोपणाच्या मोहिमांचा नुसता सुकाळ होतो. मात्र, अनेक जण केवळ ‘चमत्कारी’ किंवा प्रसिद्धीसाठी ही दिखाऊ झाडे लावून नंतर त्यांच्या संगोपनाकडे पूर्ण दुर्लक्ष करतात, हेच या जळालेल्या झाडांवरून पुन्हा सिद्ध झाले. प्रशासन आता दुप्पट झाडे लावण्याचे आश्वासन पाळणार का? अमित मुथा यांच्यासह अनेक सजग वृक्षप्रेमींनी याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे तीव्र निवेदन दिले होते. त्यावर मे २०२१ मध्ये दिलेल्या अधिकृत पत्रात, “रस्त्याचे चौपदरीकरण करताना आवश्यक तेवढीच झाडे काढण्यात येतील, शक्य तिथे वृक्षारोपण केले जाईल, मोठी झाडे वाचवली जातील आणि तोडलेल्या झाडांच्या दुप्पट झाडे लावली जातील,” असे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले होते. आता नव्याने सुरू झालेल्या लागवडीमुळे हे दिलेले आश्वासन पाळले जाणार का? याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता अन् साशंकता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *