![]()
तालुक्यातील धरणे भरली हा आनंदाचा क्षण आहे. मात्र भंडारदऱ्यातील पाण्यावर पहिला हक्क हा अकोले तालुक्याचाच राहिला पाहिजे. तालुक्यातील जनतेला पिण्यासाठी आणि शेतीसाठी मुबलक पाणी मिळालेच पाहिजे. हा आमचा घटनात्मक आणि नैसर्गिक अधिकार आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केले. प्रवरेवरील भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या पूर्ण क्षमतेने भरल्याने गुरुवारी सकाळी जलाशयावर आमदार डॉ. लहामटे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. लहामटे बोलत होते. यावेळी नायब तहसीलदार प्रमोद सावंत, जलसंपदा अभियंता प्रीतम शेवाळे, सागर ढोकणे, वसंत भालेराव, गणेश मंडलिक, जालिंदर वाकचौरे, सुधीर शेळके, शरद चौधरी उपस्थित होते. आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते जलाशयात मंत्रोच्चारात साडी-चोळी व श्रीफळ अर्पण करून धरणमातेची पूजा करण्यात आली. धरण भरल्याने शेतकरी आणि नागरिकांत आनंद व समाधान असून आमदार लहामटे यांच्या माध्यमातून तालुक्यात विविध विकासकामांबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. आ. लहामटे यांनी तालुक्यातील विकासकामे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी ठोस भूमिका मांडली. ते म्हणाले, चालू वर्षी अकोले तालुक्यात टंचाई निवारणार्थ ७ ते ८ टँकर्स सुरू होते. मात्र आगामी काळात “टँकरमुक्त अकोले” करण्याचा निश्चय आहे. त्यासाठी शासनस्तरावरून निधी उपलब्ध करून घेऊन पाणीपुरवठा योजना आणि जलसंधारणाची कामे वेगाने पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली. भंडारदरा रिंगरोडसाठी ६८ कोटी रुपयांचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवला आहे. भंडारदरा धरणाला यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण विशेष पॅकेजची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळा आराखड्यात अकोले तालुक्यातील अमृतेश्वर, हरिश्चंद्रगड आणि अगस्ती ऋषी मंदिरांचा समावेश करण्याची मागणी केली आहे. नाशिक-अकोलेसह तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. दळणवळण सुधारल्यास पर्यटनाला चालना मिळेल “तालुक्यातील दळणवळण सुधारले तर पर्यटनाला मोठी चालना मिळेल. पर्यटन वाढले की तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल, बाजारपेठा फुलतील आणि तालुक्याची आर्थिक उलाढाल वाढेल. त्यामुळे अकोल्याची प्रगती वेगाने होईल,” असा विश्वास व्यक्त करून अकोल्यातील धरणांमधील पाणीसाठ्यावर अकोल्यातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचाच पहिला हक्क राहिला पाहिजे, याचा पुनरुच्चार आ. लहामटे यांनी केला.
Source link
भंडारदरा धरणाच्या पाण्यावर पहिला हक्क अकोलेकरांचाच:घडामोड शेती व पिण्यासाठी मुबलक पाणी मिळायला हवे- आ. लहामटे