Headlines

हिंगोलीत 30 पैकी 27 मंडळात अतिवृष्टी:नदी, नाल्यांना पूर; सेनगावात पुलावरून कार वाहून गेली, चौघे बचावले




हिंगोली जिल्ह्यात मागील २४ तासात झालेल्या धुवाधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला असून कयाधू नदीच्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात मागील चोविस तासात ३० पैकी तब्बल २७ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. सेनगाव तालुक्यातील रामप्रसादनगर भागात पुराच्या पाण्यात कार वाहून गेली. मात्र सुदैवाने कार मधील चौघेही बालंबाल बचावले आहे. हिंगोली जिल्हयाला पावसाचा रेड अलर्ट सांगण्यात आला असून मागील चोविस तासापासून पाऊस सुरु आहे. गुरुवारी ता. ३० रात्री पासून पावसाने जोर धरला असून शुक्रवारी ता. ३१ पहाटे पर्यंत पावसाची रिपरिप सुरुच होती. पावसाळ्यातील हा पहिलाच धुवाधार पाऊस होता. या पावसामुळे कयाधू नदीला पुर आला असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कयाधू नदीचे पाणी हिंगोली ते समगा मार्गावरील पुलावरून वाहात असल्याने हा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे समगा, धामणी, पुर, खेड, कंजारा या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या शिवाय सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी भागातील घोरदरी नदीला पुर आल्यामुळे पुराचे पाणी रामप्रसादनगर येथील पुलावरून वाहू लागले आहे. त्यामुळे चिंचांबा (जि.वाशीम) ते येलदरी (जि. परभणी) या मार्गावरील बोरखेडी, कापडसिंगी, घोरदरी, रामप्रसादनगर, खडकी या गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, सेनगाव तालुक्यातील सालेगाव येथील रामेश्‍वर थोरवे, ज्ञानेश्‍वर थोरवे, आसाराम थोरवे, भगवान थोरवे हे एका कारमधून सेनगाव येथून सालेगाव कडे निघाले होेत. रामप्रसादनगर येथे पुलावरून पाणी जात असल्याने त्यांनी कार थांबवली. मात्र त्यांना काही कळण्याच्या आतच पुलावरील पाणी वाढल्याने कार पाण्याच्या प्रवाहात वाहून जात होते. यावेळी सतर्कता दाखवून चौघेही कारमधून बाहेर पडल्याने बालंबाल बचावले आहेत. हिंगोली जिल्ह्यात सरासरी १०३ मिलीमिटर पाऊस हिंगोली जिल्ह्यात सरासरी १०३ मिलीमिटर पाऊस झाला आहे. हिंगोली मंडळात १३१, नर्सी १५७, सिरसम १७३, बासंबा १३१, डिग्रस ११५, माळहिवरा १७३, कळमनुरी १२४, वाकोडी १२४, नांदापूर १२४, आखाडा बाळापूर ८७, डोंगरकडा ७६, वारंगा ८७, गिरगाव ११०, आंबा ८१, हट्टा ७६, कुरुंदा ६७, औंढा नागनाथ १२६, येहळेगाव ११५, साळणा १०५, जवळा बाजार ९६, सेनगाव ७०, गोरेगाव १५१, आजेगाव ७०, साखरा ८५, पानकनेरगाव ७० तर हत्ता मंडळात ९२ मिलीमिटर पाऊस झाला आहे. तर वसमत ५२, हयातनगर ५२, टेंभुर्णी मंडळात ५२ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. पुलावरून पाणी वाहतांना पुल ओलांडू नये: राहुल गुप्ता, जिल्हाधिकारी हिंगोली हिंगोली जिल्हयात पावसाचा रेड अलर्ट असून नागरीकांनी पुलावरून पाणी वाहतांना पुल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. तसेच कुठेही काही घटना घडल्यास तातडीने आपत्ती व्यवस्थापन कक्षाला माहिती द्यावी. तातडीच्या मदतीसाठी तालुकास्तरावर आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *