Headlines

पुण्यात रस्ते अपघातांचे सत्र:शहराच्या विविध भागांत झालेल्या 5 वेगवेगळ्या अपघातांत 5 जणांचा बळी




पुणे शहरात विविध भागांत झालेल्या रस्ते अपघातांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी संबंधित वाहनचालकांविरुद्ध पाच स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विश्रामबाग, उत्तमनगर, नांदेड सिटी, नऱ्हे आणि खडकी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत या घटना घडल्या आहेत. टिळक रस्त्यावर भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने ८० वर्षीय रवींद्र अनंत जोशी (आनंदनगर) गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पुत्र रोहित जोशी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक एन. भंडारे पुढील तपास करत आहेत. उत्तमनगर-खडकवासला रस्त्यावरील कुडजे गावाजवळ ४४ वर्षीय विवेक विनोद मोहरीर यांचा भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी शीतल मोहरीर यांच्या तक्रारीवरून उत्तमनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक एस. पालवे या प्रकरणाचा तपास करत आहेत. खडकवासला परिसरातील स्मशानभूमीजवळ समोरून आलेल्या भरधाव दुचाकीच्या धडकेत ४७ वर्षीय मोहम्मद गुलजार सिद्दीकी (उत्तमनगर) यांचा मृत्यू झाला. नांदेड सिटी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून, सहायक पोलीस फौजदार एल. भापकर तपास करत आहेत. नऱ्हे परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत १७ वर्षीय सुमीत राजेश राठोड याचा मृत्यू झाला. या प्रकरणी वाहनचालकासह अल्पवयीन सुमीतला दुचाकी वापरण्यास देणाऱ्या आणखी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक एम. शिरकुळे तपास करत आहेत. जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडी चौकात अवजड वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार अनिल लक्ष्मण वाघमारे (४५, गांधीनगर, पिंपरी) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून खडकी पोलिसांनी अवजड वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक एस. गालफाडे पुढील तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *