Headlines

अहिल्यानगरमधील संतापजनक प्रकार!:प्राचार्यांनी तिसरीच्या विद्यार्थ्याचा गळा दाबून हवेत उचलले, नंतर हाताचा चावाही घेतला




शाळा हे विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानाचे आणि सुरक्षिततेचे हक्काचे ठिकाण मानले जाते, जिथे शिक्षकांकडून त्यांना हक्काचे प्रेम आणि योग्य मार्गदर्शन मिळणे अपेक्षित असते. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांवरील शारीरिक शिक्षेला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक कायदे लागू केले असले तरी, काही असंवेदनशील शिक्षकांच्या वर्तणुकीत अद्यापही बदल झालेला नाही. याच वास्तवाचा प्रत्यय अहिल्यानगरमध्ये नुकत्याच समोर आलेल्या एका अत्यंत संतापजनक घटनेवरून आला असून, येथे एका शिक्षकाने अमानुषपणे थेट एका चिमुकल्या विद्यार्थ्याचा हातच चावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. अहिल्यानगर शहराजवळील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत एका आठ वर्षीय विद्यार्थ्यासोबत अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. वर्गातील विद्यार्थ्यांच्या आपापसांतील भांडणाची माहिती या तिसरीत शिकणाऱ्या चिमुकल्याने वर्गशिक्षिका ज्योती मॅडम यांना दिल्यानंतर, त्यांनी प्राचार्य गौतम बहादुर्गे यांना वर्गात बोलावले. मात्र, समजूत काढण्याऐवजी प्राचार्यांनी रागाच्या भरात या विद्यार्थ्याचा चक्क हात चावला आणि गळा दाबून त्याला काही सेकंद हवेत उचलून धरले. या अमानुष घटनेप्रकरणी विद्यार्थ्याचे वडील सोनल शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, नगर तालुका पोलिस ठाण्यात प्राचार्य बहादुर्गे यांच्याविरुद्ध बाल न्याय अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गळा पकडून विद्यार्थ्याला हवेत धरले, नंतर हाताचा चावा घेतला वर्गात आल्यावर प्राचार्यांनी सुरुवातीला भांडण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कान पिळले. मात्र, त्यानंतर ‘भांडण कसे करतात ते मी दाखवतो,’ अशी धमकी देत त्यांनी चक्क तक्रार करणाऱ्या त्या आठ वर्षीय निष्पाप विद्यार्थ्याचा गळा पकडून त्याला थेट हवेत उचलले. पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, प्राचार्यांनी एक ते वीस आकडे मोजत तब्बल वीस सेकंद या चिमुकल्याला हवेतच लटकवून ठेवले आणि खाली सोडल्यानंतर अत्यंत क्रूरपणे त्याच्या हाताचा कडाडून चावा घेतला, असा गंभीर व संतापजनक आरोप करण्यात आला आहे. “.. मी लेखी माफी मागतो” घरी परतल्यानंतर मुलाची घाबरलेली अवस्था आणि हातावरील जखम पाहून हा धक्कादायक प्रकार पालकांच्या निदर्शनास आला, ज्यानंतर त्यांनी तात्काळ मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या संतापजनक घटनेबाबत पालकांनी दूरध्वनीवरून प्राचार्यांना जाब विचारला असता, “माझ्याकडून चुकून ही घटना घडली असून मी लेखी माफी मागतो,” अशी सारवासारव प्राचार्यांनी केल्याचा दावा पालकांनी केला आहे. मात्र, एका निष्पाप विद्यार्थ्याचा असा अमानुष शारीरिक आणि मानसिक छळ अत्यंत गंभीर असून, या बेजबाबदार प्राचार्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, अशी आक्रमक मागणी विद्यार्थ्याचे वडील सोनल शेळके यांनी केली आहे. दरम्यान, या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास युद्धपातळीवर सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *