Headlines

वन विभागाच्या अधिकाऱ्याला 45 लाखांची लाच घेताना अटक:सुनेत्रा पवारांच्या बैठकीनंतर एसीबीची कारवाई, प्रशासकीय वर्तुळात खळबळ




बीडमध्ये एकीकडे जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्र्यांची महत्त्वाची बैठक सुरू असताना, दुसरीकडे मात्र शासकीय अधिकारी भ्रष्टाचाराची कोट्यवधींची ‘डील’ करण्यात मग्न होते. बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपून बाहेर पडलेले सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावार यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. स्वतःच्याच राहत्या घरी तब्बल ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लखमावार रंगेहाथ जाळ्यात सापडले. या कारवाईमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, सामाजिक वनीकरण विभागांतर्गत सन २०२५-२६ मधील वृक्षलागवडीची रखडलेली बिले मंजूर करणे, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन काढणे आणि निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी लखमावार यांनी तब्बल ४५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार लाच देण्यास इच्छुक नसल्याने, त्यांनी २९ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर एसीबीकडे धाव घेतली. तक्रारीत तथ्य आढळल्यानंतर एसीबीने अत्यंत गुप्ततेने सापळा रचला. ४५ लाखांची भलामोठी रक्कम एकत्र करणे शक्य नसल्याने, एसीबीने एक विशेष रणनीती आखली. ५ लाख रुपयांच्या खऱ्या नोटा आणि उर्वरित ४० लाख रुपयांच्या ‘मनोरंजन बँकेच्या’ नोटा एकत्र करून त्याचे बंडल तयार करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी लखमावार यांनी तक्रारदाराला घरी बोलावून ही रक्कम हातात घेताच, दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना बेड्या ठोकल्या. बैठकीनंतर घरी बोलावून लाच घेण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीची उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला लखमावार अधिकृतरीत्या उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर ते कार्यालयात गेले आणि तेथून तक्रारदाराला थेट घरी बोलावून लाच उकळण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यानच एवढ्या मोठ्या रक्कमेची लाच उघडकीस आल्याने, अधिकाऱ्यांना कायद्याचा कसलाही धाक उरला नसल्याचे उघड झाले आहे. एसपी माधुरी कांगणेंच्या नेतृत्वात कारवाई या धक्कादायक कारवाईची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगर एसीबीच्या पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे यांनी स्वतः बीड गाठून तपासाची सूत्रे हातात घेतली आहेत. लखमावार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या कारवाईमुळे जिल्ह्यातील इतर भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून, लखमावार यांच्या घरातून किंवा इतर मालमत्तांमधून भ्रष्टाचाराचे आणखी कोणते काळे कारनामे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *