Headlines

जिल्हाधिकारी डूडी म्हणाले- विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीसोबत आरोग्यावर लक्ष द्यावे:सिंबायोसिसमध्ये 'वसुधैव कुटुंबकम्' संदेशासह आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन साजरा




विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीसोबतच क्रीडा, मानसिक आणि भावनिक आरोग्याकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले. सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्रातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात ‘वसुधैव कुटुंबकम्’चा संदेश देत सांस्कृतिक विविधता आणि जागतिक मैत्रीचा जागर करण्यात आला. जिल्हाधिकारी डूडी म्हणाले की, समाजासमोरील विविध आव्हानांवर मात करण्यासाठी आणि राष्ट्रनिर्मितीत अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी भावी पिढीने शासनासोबत समन्वयाने कार्य करणे आवश्यक आहे. आज पुणे शहर पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करत आहे आणि शासनाला आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रांतील समस्यांवर दररोज काम करावे लागते. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजहितासाठी करावा, असे आवाहनही त्यांनी केले. सेनापती बापट रस्त्यावरील सिंबायोसिस विश्वभवन सभागृहात हा आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. विविध देशांतील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंबायोसिसचे संस्थापक आणि अध्यक्ष प्रा. डॉ. शां. ब. मुजुमदार उपस्थित होते. यावेळी सिंबायोसिसच्या प्रधान संचालिका व सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या कुलपती, डॉ. विद्या येरवडेकर, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू, डॉ. रामकृष्णन रमन तसेच सिंबायोसिस इंटरनॅशनल स्टुडंट्स कौन्सिलचे अध्यक्ष हेन्री टेबांडेके (युगांडा) आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी सांगितले की, १९७१ मध्ये सिंबायोसिसची स्थापना विविध देशांतील विद्यार्थ्यांना एका छताखाली आणण्याच्या उदात्त ध्येयाने झाली. आज ८५ देशांतील विद्यार्थी येथे शिक्षण घेत असून ते स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे. सिंबायोसिसमध्ये निर्माण होणारी मैत्री भौगोलिक सीमा ओलांडणारी असून ती विद्यार्थ्यांना शांतता, परस्पर आदर, मानवी मूल्ये आणि जागतिक बंधुभाव जपणारे जबाबदार जागतिक नागरिक बनवते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *