Headlines

अमली पदार्थांच्या आरोपीला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवण्याचे न्यायालयाचे आदेश:पुणे पोलिसांच्या 'ड्रग फ्री पुणे' मोहिमेला मोठे यश




पुणे शहरात ‘ड्रग फ्री पुणे’ मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत (NDPS) अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने व्यसनमुक्तीसाठी उपचार घेण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर, न्यायालयाने त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पुणे शहर पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील ही पहिलीच घटना असून, व्यसनाधीनांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. पुणे पोलिसांनी २०२३ मध्ये राबवलेल्या विशेष मोहिमेदरम्यान आतापर्यंत १६२ गुन्हे दाखल केले असून, २८३ आरोपींना अटक केली आहे. या कारवायांमध्ये तब्बल ११ कोटी २८ लाख रुपयांहून अधिक किमतीचा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी पीआयटी-एनडीपीएस आणि मोक्का कायद्यांतर्गतही कठोर कारवाई सुरू आहे. पोलिसांनी भविष्यातही अशाच प्रकारची मोहीम अधिक तीव्र केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. कायदेशीर कारवाईबरोबरच जनजागृती आणि व्यसनमुक्ती या दोन्ही आघाड्यांवर भर देत ‘ड्रग फ्री पुणे’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मोहीम अधिक प्रभावीपणे सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, अमली पदार्थांच्या सेवनाविरोधात जनजागृतीसाठी पुणे पोलिसांनी ‘सिक्युअर होरायझन फॉर यूथ’ या उपक्रमांतर्गत शाळा, महाविद्यालये आणि विविध शैक्षणिक संस्थांमध्ये व्यापक अभियान सुरू केले आहे. १६ जुलै रोजी आयोजित विशेष कार्यक्रमात तीन हजारांहून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि पालक सहभागी झाले होते. याशिवाय, या वर्षात आतापर्यंत १०४ जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *