Headlines

राम नदी चित्रपट महोत्सव सुरू:ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ परांजपे यांच्या हस्ते उदघाटन, नदी परिसरातील नैसर्गिक अधिवास जतनाचे आवाहन




कोहिनूर कट्टातर्फे आयोजित कोहिनूर राम नदी चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ पर्यावरण व पाणी तज्ज्ञ तसेच गोमुखचे अध्यक्ष प्रा. विजय परांजपे यांच्या हस्ते महोत्सवाच्या पोस्टरचे अनावरण करून त्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना प्रा. परांजपे यांनी राम नदीच्या पुनरुज्जीवनासाठी तिच्या उगमस्थानापासून संगमापर्यंत सखोल अभ्यास होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. नदीची वारी-परिक्रमा व्हावी आणि मानवनिर्मित चुकांमुळे झालेले प्रदूषण कमी करणे अत्यंत गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. प्रा. परांजपे यांनी ‘राम नदी काल-आज-उद्या’ या विषयावर आपले विचार मांडले. नदी परिसरातील नैसर्गिक अधिवासही जतन करणे हे मानवाचे कर्तव्य असून, राम नदी प्रदूषित होण्यास मानवच जबाबदार आहे, यावर त्यांनी भर दिला. राम नदीशी नाते निर्माण व्हावे, तिच्या जैवविविधतेचा अभ्यास व्हावा आणि तिची स्वच्छता राखण्यासाठी युवा पिढी प्रेरित व्हावी, या उद्देशाने गेल्या पाच वर्षांपासून हा चित्रपट महोत्सव आयोजित केला जात आहे. यावेळी कोहिनूर ग्रुपचे संचालक विनीत गोयल, संयोजक वीरेंद्र चित्राव आणि अनिल गायकवाड मंचावर उपस्थित होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रा. विजय परांजपे पुढे म्हणाले की, नदीचे संरक्षण-संवर्धन याविषयी अभ्यास करताना नदीतील जिवंत झरे, खडक, धबधबे यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. मानवनिर्मित प्रदूषणामुळे झालेला नदीचा ऱ्हास समजून घेऊन त्या चुका पुन्हा होऊ न देता सुधारणा करणे गरजेचे आहे. नदीच्या पाण्यात स्वशुद्धीकरणाची यंत्रणा अस्तित्वात असतेच; परंतु मानवाने छोट्या प्रक्रियांमधून नदीच्या पाण्याची शुद्धता सांभाळणे, त्याकरिता नदीला येऊन मिळणाऱ्या नाले-ओढ्यांचे शुद्धीकरण करणे आवश्यक आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना नदीची परिक्रमा करून तिची वैशिष्ट्ये नोंदवण्याचा, पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करून विश्लेषण करण्याचा सल्ला दिला. विनीत गोयल यांनी यावेळी बोलताना सांगितले की, भारतीय परंपरेत नदीला मातेसमान मानले जाते आणि तिचे पूजन केले जाते. नदी प्रदूषित झाल्यास संपूर्ण सृष्टीचे चक्र बिघडते, त्यामुळे नद्या स्वच्छ राहणे अत्यंत गरजेचे आहे. हे कार्य कुणा एकाचे नसून, यासाठी योग्य त्या मार्गदर्शनाखाली समाजाने एकत्र काम करणे आवश्यक आहे. कोहिनूर राम नदी चित्रपट महोत्सव युवा पिढीसाठी प्रेरक असून, या उपक्रमास सातत्याने सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. वीरेंद्र चित्राव यांनी प्रास्ताविकात सांगितले की, सातत्याने दुर्लक्षित राहिलेल्या १९.२ किमी लांबीच्या राम नदीचा प्रवाह पूर्वीप्रमाणे जास्तीत जास्त शुद्ध व्हावा आणि ती अविरल व निर्मल व्हावी, या उद्देशाने सातत्याने काम चालू आहे. अशी नदी शांतताप्रिय व आनंदी समाज घडवण्यासाठी मदत करेल आणि यातून भावी पिढ्यांसाठी समृद्ध निसर्ग निर्माण होईल. नदीच्या पुनरुज्जीवनासाठी सर्वसमावेशक व शाश्वत प्रारूप तयार करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणजे हा महोत्सव आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *