Headlines

बालिकेच्या मृत्यू प्रकरणात ग्रामसेवक निलंबित:असमाधानकारक खुलास्यानंतर आणखी दोघांवर कारवाईची शक्यता




चिखलदरा तालुक्यातील कोरडा ग्रामपंचायत अंतर्गत हनुमानढाणा गावात एका बालिकेचा खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याच्या प्रकरणात ग्रामपंचायत अधिकारी विनायक मालसिंग धुर्वे यांना निलंबित करण्यात आले आहे. ही घटना बुधवारी घडली होती. धुर्वे यांच्यावर कामात हयगय, प्रचंड निष्काळजीपणा आणि वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना केल्याचा आरोप आहे. चिखलदरा येथील गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांनी याबाबतचे अधिकृत पत्र जारी केले आहे. निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय बदलून देण्याची विनंती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आली आहे. या घटनेनंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी दुसऱ्याच दिवशी सकाळी पाणी पुरवठा विभागाच्या प्रभारी कार्यकारी अभियंत्यांसह संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी या तिघांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली होती. हनुमानढाणा येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे. मात्र, प्रत्यक्ष नळ कनेक्शन न मिळाल्याने नागरिकांना घरासमोरून जाणाऱ्या पाईपलाईनपर्यंत खड्डे खोदून पाणी मिळवावे लागते. अशाच एका तीन फूट खोल खड्ड्यात बुधवारी नायरा वनिता संजू भुसूम या पावणे दोन वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. जिल्हा परिषद प्रशासनाच्या मते, संबंधित कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली. पावसाळ्यापूर्वीच हे खड्डे बुजविणे अपेक्षित होते, परंतु तसे झाले नाही. एका अधिकाऱ्याचे निलंबन झाले असून, उर्वरित दोघांच्या स्पष्टीकरणानंतर या प्रकरणाला नेमके कोण जबाबदार आहे, हे निश्चित केले जाईल. ग्रामपंचायत अधिकारी मालसिंग धुर्वे यांच्याकडे कोरडा या ग्रामपंचायतीसोबतच बिबा आणि बारुगव्हाण या दोन ग्रामपंचायतींचीही जबाबदारी होती. मात्र, त्यांनी या तिन्ही ठिकाणी योग्यपणे कर्तव्य बजावले नाही. त्यांना वारंवार पत्रे देऊनही त्यांनी उत्तरे दिली नाहीत आणि कामांबाबतच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे जिल्हा परिषद सेवा नियम १८६४ च्या कलम ५(२) नुसार बीडीओ खेडकर यांनी त्यांच्यावर कारवाई केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *