![]()
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन उभे करणे, या घटनेतील साक्षीदार मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या साडेचार वर्षांपूर्वीच्या प्रकरणात मुंबईतील विशेष ‘एनआयए’ न्यायालयाने शनिवारी बडतर्फ सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे, माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासह १० आरोपींविरोधात ‘यूएपीए’, हत्या आणि गुन्हेगारी कटाचे औपचारिक दोषारोप निश्चित केले. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) आरोपपत्रानुसार १०० कोटींची वसुली, दहशत निर्माण करणे आणि पोलिस दलात वर्चस्व स्थापनेसाठी वाझेने हा संपूर्ण कट रचला होता. या कटात हिरेन यांनी साथ देण्यास नकार दिल्याने त्यांची हत्या केली. आता या प्रकरणी सुनावणी सुरू होणार आहे. एनआयए तपासातील चार प्रमुख निष्कर्ष १. श्रीमंत व्यावसायिकांमध्ये दहशत निर्माण करून दरमहा १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करणे, पोलिस दलात वर्चस्व सिद्ध करणे हा वाझेचा मुख्य हेतू होता.
२. तपासाची दिशा भरकटवण्यासाठी ‘जैश-उल-हिंद’ या टेलिग्राम चॅनलचा वापर करून बनावट धमकीचा संदेश प्रसारित केला होता.
३. स्फोटकांनी भरलेल्या वाहनाची जबाबदारी घेण्यास मनसुख हिरेन यांनी नकार दिला.यामुळे कट उघड होण्याच्या भीतीने वाझे, शर्मांनी हिरेन यांच्या हत्येचा कट रचला.
४. सीसीटीव्ही फुटेज, डीव्हीआर व मोबाइल नष्ट करण्यासोबतच घटनेच्या रात्री आपण हजर नव्हतो हे दर्शवण्यासाठी आरोपींनी मध्यरात्री बोगस छापे टाकून पंचनामे केले.
Source link
अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण:वाझेने 100 कोटी वसुलीसाठी रचला होता कट, एनआयए कोर्टात वाझे, शर्मांसह 10 वर दोषारोप