![]()
मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान आज अभूतपूर्व गोंधळ आणि राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात केलेल्या एका विधानामुळे सभागृहात अक्षरशः ठिणगी पडली. सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी या विधानावर तीव्र संताप व्यक्त करत पेडणेकर यांनी माफी मागावी, अशी मागणी लावून धरली. या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब करावे लागले, मात्र दिवसभराच्या नाट्यमय घडामोडींनंतरही हा पेच सुटू शकला नाही. सभागृहात महापौरांच्या सन्मानावरून चर्चा सुरू असताना वादाला तोंड फुटले. नवनिर्वाचित सदस्यांनी महापौरांचा मान राखला पाहिजे, असा मुद्दा सभागृह नेते गणेश खणकर यांनी उपस्थित केला. याला प्रत्युत्तर देताना “आमच्यावर बाळासाहेबांचे संस्कार आहेत, आम्ही ते विकत घेतलेले नाहीत,” असे विधान किशोरी पेडणेकर यांनी केले. त्यांचा रोख हा शिवसेना शिंदे गटाकडे होता. किशोरी पेडणेकर यांच्या या विधानातून बाळासाहेबांचा अवमान झाल्याचा अर्थ सत्ताधाऱ्यांनी काढला आणि संपूर्ण सभागृह घोषणाबाजीने दणाणून गेले. “किशोरी पेडणेकर माफी मागा”, “बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद” अशा घोषणा सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी दिल्या. १० मिनिटांची तहकुबी आणि निलंबनाची मागणी वातावरण तणावपूर्ण झाल्याने महापौर रितू तावडे यांनी कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले. मात्र, पुन्हा कामकाज सुरू झाल्यावरही शांतता प्रस्थापित झाली नाही. उलट, सभागृह नेते गणेश खणकर यांनी आक्रमक पवित्रा घेत, किशोरी पेडणेकर यांनी थेट बाळासाहेबांच्या संस्कारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचा आरोप केला. “बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या सदस्याला सभागृहात राहण्याचा अधिकार नाही, त्यांना तात्काळ निलंबित करा,” अशी मागणी खणकर यांनी लावून धरली. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा आवाजाची धार वाढली. निधी वाटपावरून विरोधकांचा संताप या गदारोळात काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी मूळ मुद्द्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. अर्थसंकल्पात विरोधकांच्या प्रभागांना निधी वाटपात दुजाभाव केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “विरोधकांना बोलू दिले जात नाही आणि निधीही दिला जात नाही,” असे म्हणत आझमी यांनी सत्ताधाऱ्यांच्या हुकूमशाही प्रवृत्तीचा निषेध केला. मात्र, त्यांच्या या मुद्द्याकडे दुर्लक्ष झाल्याने विरोधकही आक्रमक झाले. पेडणेकरांचे स्पष्टीकरण आणि महापौरांचा इशारा वाढता विरोध पाहून किशोरी पेडणेकर यांनी आपले स्पष्टीकरण मांडले. त्या म्हणाल्या, “माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. मी बाळासाहेबांचे विचार किंवा संस्कार विकत घेतले नाहीत, असे म्हटले होते. सत्ताधारी मूळ मुद्द्यावरून लक्ष भरकटवण्यासाठी हा गदारोळ करत आहेत.” असे सांगून त्यांनी माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला. मात्र, महापौर रितू तावडे या स्पष्टीकरणाने समाधानी झाल्या नाहीत. “बाळासाहेब ठाकरे हे केवळ एका पक्षाचे नसून ते सर्वांचे आहेत. त्यांच्या संदर्भात चुकीचे शब्द वापरणे खपवून घेतले जाणार नाही. जोपर्यंत पेडणेकर माफी मागत नाहीत, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालणार नाही,” असा कडक इशारा महापौरांनी दिला आणि सभागृह पुन्हा एकदा तहकूब करण्यात आले.
Source link
आम्ही बाळासाहेबांचे संस्कार विकत घेतले नाहीत:किशोरी पेडणेकरांचे विधान; माफी मागेपर्यंत बीएमसीचे सभागृह चालणार नाही, महापौरांचा पवित्रा