![]()
जीवनात येणाऱ्या चढ-उतारांमुळे खचून न जाता परिस्थितीशी झुंज देणे आवश्यक आहे. यश किंवा पद मिळाले तरी आपल्या मूळ मूल्यांशी व तत्त्वांशी कधीही तडजोड करू नये, असे स्पष्ट आणि परखड मत अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त, तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले. शहरातील पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल कॅम्पसमधील स्वामी विवेकानंद सभागृहात आयोजित ‘संवाद तरुणाईशी’ या कार्यक्रमात ते विद्यार्थी व इतर उपस्थितांशी संवाद साधत होते. यावेळी आमदार प्रवीण पोटे, प्रदीप चेचरे व अन्य आयोजक मंडळी, मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. जवळपास २१ वर्षांनंतर अमरावतीमधील जनतेशी संवाद साधताना मुंढे यांनी त्यांच्या प्रशासकीय प्रवासातील विविध आठवणींना उजाळा दिला. वरीष्ठ अधिकारी झाल्यानंतर एका क्षणात समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलतो, याविषयी सांगताना ते म्हणाले की, एका क्षणात मिळणारा हा बदल विचारांच्या व आचरणाच्या ताकदीमुळे असतो. सध्याच्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाच्या युगावर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले की, “माहिती आणि ज्ञान आज प्रत्येकाच्या मोबाईलवर उपलब्ध आहे. परंतु, आजच्या पिढीसमोर सर्वात मोठा प्रश्न बुद्धिमत्तेपेक्षा ‘विवेक’ जपण्याचा आहे. तंत्रज्ञानामुळे नोकऱ्यांचे स्वरूप बदलेल, परंतु मानवी अस्तित्वाला आणि विवेकाला पर्याय नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून नागरिक, पालक व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुकाराम मुंढे यांनी उपस्थितांचे आभार मानून मार्गदर्शन न करता केवळ थेट संवाद साधण्यावर भर दिला. स्क्रीन टाईम आणि न्यूनगंड ताळमेळ हवा तरुण पिढी दिवसातील ७ ते ९ तास मोबाईल स्क्रीनवर घालवते. सोशल मीडियावरील रिल्स, नट-नट्यांचे काल्पनिक आणि क्युरेट केलेले आयुष्य यांशी स्वतःची तुलना केल्यामुळे तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर न्यूनगंड निर्माण होत आहे. सोशल मीडियावर फक्त अंतिम यश दाखवले जाते, परंतु त्यामागील शेकडो अयशस्वी प्रयत्न किंवा कष्ट समोर येत नाहीत. त्यामुळे तरुणांनी केवळ यशाची तुलना न करता अभ्यास करणे गरजेचे आहे.
Source link
परिस्थितीशी जुळवून घेताना तत्त्वांशी तडजोड नको:आयएएस तुकाराम मुंढे यांचे उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, ‘विवेक'' जपण्याची गरज