![]()
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा विद्यापीठाच्या प्रगतीत महत्त्वाचा वाटा असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ आयोजित कर्तव्यपूर्ती सोहळा कुलगुरुंच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, वित्त व लेखा अधिकारी सीए. पुष्कर देशपांडे, कार्यकारी अभियंता श शिकांत रोडे, उपकुलसचिव मंगेश वरखेडे उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी विजय चवरे, प्रशांत देशमुख आणि शरद चव्हाण यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व गौरव प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या पत्नींचाही साडी-चोळी व कुंकवाचा करंडा देऊन सन्मान करण्यात आला. डॉ. बारहाते पुढे म्हणाले की, बाह्य यंत्रणेद्वारे कर्मचारी भरती होत असली तरी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा अनुभव विद्यापीठासाठी मोलाचा आहे. भविष्यातही त्यांच्या अनुभवाचा लाभ विद्यापीठ घेत राहील. तर प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी सत्कारमूर्तींना निरामय आरोग्य व सुखी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय देशमुख यांनीही त्यांच्या कार्याचा गौरव केला. सत्कारमूर्तींनी आपल्या मनोगतातून सेवाकाळातील अनुभव मांडत सहकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने झाली. यावेळी सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी केले, तर आभार अधीक्षक डॉ. धनंजय पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, सेवानिवृत्त कर्मचारी तसेच सत्कारमूर्तींच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा विद्यापीठाच्या प्रगतीत उल्लेख केल्याबद्दल सर्वांनी आभार व्यक्त केले. प्रतिनिधी | अमरावती येथील साईनगर स्थित श्री साईबाबा विद्यालय येथे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून सत्र २०२५-२६ मधील एसएससी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी शाळा समितीचे अध्यक्ष जुगलकिशोर गट्टानी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून शाळा समितीचे सचिव राजेश हेडा, मुख्याध्यापक राजेश टावरी, पर्यवेक्षक आशीष प्रसारकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा रेणुका टवलारे उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते विद्यालयाचे आराध्य दैवत श्री साईबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी एसएससी परीक्षेत विद्यालयातून प्रथम क्रमांक मिळवणारी भार्गवी मालोकार, द्वितीय क्रमांकाची मनस्वी पवार आणि तृतीय क्रमांकाची आरंभी ठाकरे यांचा पुष्पगुच्छ, मेडल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या पालकांचाही विशेष सन्मान करण्यात आला. याशिवाय विविध विषयांमध्ये विद्यालयातून प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. मुख्याध्यापक राजेश टावरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत विद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेत एसएससी परीक्षेतील उत्कृष्ट निकालाची माहिती उपस्थितांना दिली. तसेच उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त आणि जिद्दीच्या बळावर मोठी स्वप्ने पूर्ण करता येतात, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी सध्याच्या यशावर न थांबता भविष्यातही विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करून विद्यालयाचे, पालकांचे आणि शहराचे नाव उज्ज्वल करावे असा संदेश दिला. या कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी, पालक व माजी शिक्षकांची उपस्थिती होती. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन कामगार नेते, कथा, कादंबरीकार, कवी, नाट्य कलावंत, लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंतीसुद्धा विद्यापीठात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले. जयंती कार्यक्रमालासुद्धा प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, उपकुलसचिव डॉ. दादाराव चव्हाण, उपअभियंता (विद्युत) राजेश एडले तसेच विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संचालन व श्री अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल माहिती जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी दिली.
Source link
सेवानिवृत्त कर्मचारी विद्यापीठाचे खरे मार्गदर्शक- कुलगुरु बारहाते:निवृत्त कर्मचाऱ्यांचा कर्तव्यपूर्ती सोहळा, पत्नींचाही केला सन्मान