Headlines

32 हजार काेटींच्या निधीतून नाशिकचा कुंभ भव्य-दिव्य हाेणार:दिव्य मराठी आयोजित सिंहस्थ कॉन्क्लेव्हमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली दिशा स्पष्ट




सिंहस्थ कुंभमेळा केवळ धार्मिक सोहळा नसून भारताच्या अध्यात्म, संस्कृती, सनातन परंपरेचे जागतिक दर्शन घडविणारा महाउत्सव आहे. त्यामुळे नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षी ऑक्टोबरपासून होणाऱ्या सिंहस्थासाठी शासन कोणतीही तडजोड करणार नाही. 32 हजार कोटी रुपयांच्या निधीतून ‘दिव्य कुंभ, भव्य कुंभ, सुरक्षित, स्वच्छ आणि पवित्र कुंभ’ घडविण्यासाठी आवश्यक सर्व सुविधा उभारल्या जातील. निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. दिव्य मराठीतर्फे मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आयोजित सिंहस्थ कॉन्क्लेव्हच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी कुंभमेळ्याविषयी दिशा स्पष्ट केली. या वेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, भास्कर वृत्तपत्र समूहाचे संचालक गिरीश अग्रवाल, श्री श्री 1008 डॉ. कल्कीराम महाराज, फ्रावशी अकादमीचे रतन लथ यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. नाशिकमधील सिंहस्थाच्या शिलेदारांचा गौरव मुंबई | ‘दिव्य मराठी’च्या वतीने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शुक्रवारी सिंहस्थ कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या यशस्वितेसाठी सुरुवातीपासून प्रयत्नशील असलेल्या नाशिकमधील मान्यवरांचा या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘सिंहस्थांचे शिलेदार’ पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, वस्रोद्योगमंत्री संजय सावकारे, भास्कर समूहाचे संचालक गिरीश अग्रवाल यांच्यासह मान्यवर आणि पुरस्कारार्थी उपस्थित होते. ठाणे, पुण्याच्या धर्तीवर नाशिकमध्येही युनिफाइड डीसीपीआर (एकत्रित विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली) लागू करणार, असे आश्वासन उपमुख्यमंत्री व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘दिव्य मराठी’ आयोजित सिंहस्थ कॉन्क्लेव्हमध्ये दिले. नाशिकच्या रिअल इस्टेटमध्ये या घोषणेचे अत्यंत महत्त्व आहे. युनिफाइड डीसीपीआरमुळे जुन्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. बांधकाम व्यावसायिकांकडून सातत्याने याची मागणी करण्यात येत होती. त्यामुळे शिंदे यांची ही घोषणा महत्त्वाची मानली जात आहे. आम्ही देणारे आहोत, घेणारे नाहीत, असेही त्यांनी या घोषणेवेळी सांगितले. कॉन्क्लेव्हमध्ये शिंदे म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना कुंभमेळ्याच्या नियोजनाची पहिली बैठक घेण्याचे भाग्य मला लाभले. आताही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात मी व आमचे मंत्री सातत्याने या सोहळ्याच्या नियोजनासाठी काम करत आहोत. आता नगरविकास विभागाचा मंत्री म्हणून मी नाशिकमध्ये बैठक घेईल. ‘दिव्य मराठी’ने बातम्यांपुरते मर्यादित न राहता सिंहस्थासारख्या विषयावर कॉन्क्लेव्ह आयोजित करून समाजाप्रति आपली वेगळी जबाबदारी पार पाडली आहे. 12 कोटी भाविक येण्याची शक्यता सिंहस्थाच्या नियोजनासाठी स्वतंत्र प्राधिकरण, स्वतंत्र कायदा, स्वतंत्र निधी, मंत्री समिती, शिखर समिती आणि कार्यकारी समिती कार्यरत असून आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि वैज्ञानिक नियोजनाचा वापर केला जाणार आहे. प्रयागराज कुंभमेळ्याचा अभ्यास करून नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थाचे नियोजन करण्यात येत असल्याचे सांगत त्यांनी सुमारे 12 कोटी भाविक येण्याच्या शक्यतेमुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान असल्याचे नमूद केले. साधुग्राम, रस्ते, पार्किंग, स्वच्छता, मोबाइल टॉयलेट, जमीन संपादन, अतिक्रमण निर्मूलन, पावसाळी नियोजन अशा सर्व कामांवर शासन लक्ष केंद्रित करत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. यांची प्रमुख उपस्थिती ‘दिव्य मराठी’तर्फे आयोजित सिंहस्थ कॉन्क्लेव्हमध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम, एमआयडीसीचे सीईओ दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, संत-महंत व विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी बहारदार सूत्रसंचालन केले. नाशिकमध्ये काय होणार 1450 एकरवर साधुग्राम, आता तेथे आखाड्यांसाठी जागा देण्याचे नियोजन होणार.
नाशिक व त्र्यंबकमध्ये मिळून 2,283 एकर जमीन संपादनाचे नियोजन, त्यासाठी 2,267 कोटी निधी मंजूर.
नाशिक शहरात 377 एकर जमीन आरक्षित, त्यापैकी 94 एकर संपादित.
रस्ते, स्वच्छता, पार्किंग व मूलभूत सुविधांना प्राधान्य. प्रदूषणमुक्त, तंत्रज्ञानयुक्त कुंभमेळ्यातून नाशिकलाजागतिक ओळख मिळवून देणार : नितीन गडकरी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत सांगितले की, मी व्हायरल इन्फेशनमुळे या कार्यक्रमाला प्रत्यक्ष येऊ शकलो नाही. हा कुंभमेळा नाशिकच्या पुढील 50 वर्षांच्या सुविधांचा पाया ठरेल. प्रदूषणमुक्त, तंत्रज्ञान युक्त कुंभमेळ्यातून नाशिकला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. गोदावरीत जलप्रदूषण होऊ नये याची दक्षता घेणे गरजेचे आहे. वर्णी ते पिंपळगाव, नाशिक-पेठ या 37 किमी, घोटी-पेंगलवाडी-जव्हार हा 47.60 किमी पालघर-जव्हार या चौपदरी महामार्गांसारखी महत्त्वाची कामे मंजूर केली आहेत, असेही त्यांनी सांगितले. 12 कोटी भाविकांच्या सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही : एकनाथ शिंदे शिंदे म्हणाले की, दिव्य मराठीचे अनोख्या पद्धतीने सिंहस्थ कॉन्क्लेव्हचे आयोजन खरंच कौतुकास्पद आहे. सत्य सांगू बिनधास्त ही दिव्य मराठीची टॅगलाइन आहे. माझीही हीच टॅगलाइन आहे. आपण सत्यच बोलतो. अन् जे बोलतो ते करून दाखवतो अन् बेधडक सांगतोही. सत्य काम करणाऱ्या माणसाला काहीही लपवाछपवी करण्याची गरज नसते. दिव्य मराठी व भास्कर वृत्तपत्र समूह देशातील नंबर वन समूह आहे. तुमच्या माध्यमातून कुंभ सोहळ्याचे वार्तांकन देशभर जाणार आहे. तुम्ही सिंहस्थ कॉन्क्लेव्ह यशस्वीपणे साजरा करून दाखवला. आता तुमची कुंभमेळा यशस्वितेची जबाबदारीही वाढली आहे. आपल्या सर्वांचीच जबाबदारी वाढली आहे, असेही शिंदे म्हणाले. सरकारची मोठी तयारी
32 हजार कोटींचे नियोजन
12 कोटी भाविक येण्याचा अंदाज
31 ऑक्टोबर 2026 रोजी ध्वजारोहणाने प्रारंभ होणार आहे
2 ऑगस्ट 2027 रोजी पहिले अमृतस्नान
स्वतंत्र प्राधिकरण, स्वतंत्र कायदा व स्वतंत्र निधी
AI व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवस्थापनावर भर देणार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *