Headlines

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते 'जन जंगल' पुस्तकाचे प्रकाशन:किशोर रिठे यांच्या पुस्तकात 5 दशकांतील वन्यजीव संवर्धनाचा आढावा




जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र वन्यजीव विभागातर्फे नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेत (IIM) एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठ निसर्ग व वन्यजीव अभ्यासक आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (BNHS) संचालक किशोर रिठे यांच्या ‘जन जंगल’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. मराठीत लिहिलेल्या या पुस्तकात भारतातील व्याघ्र संरक्षणाची गेल्या पाच दशकांतील स्थिती सोप्या भाषेत मांडण्यात आली आहे. वाघांसोबतच माळढोक, तनमोर/खारमोर, इंडियन स्किमर, हिरवी मुनिया यांसारख्या दुर्मिळ आणि फारशा परिचित नसलेल्या प्रजाती, पक्षी, मासे, रानहत्ती, सिंह आणि चित्ते यांच्या संवर्धनाचा आढावा या ग्रंथात घेण्यात आला आहे. या पुस्तकाचा मुख्य उद्देश समुद्र, नद्या, पाणथळ प्रदेश, खारफुटीची जंगले, गवताळ प्रदेश आणि वने या वन्यजीवांच्या अधिवासांसमोर निर्माण झालेले प्रश्न आणि त्यांच्या संवर्धनाचे उपाय मराठी वाचकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ८६ वर्षांनंतर नामशेष मानल्या गेलेल्या ‘जर्डन्स कोर्सर’ या पक्ष्याचा पुनर्रशोध लावणारे बीएनएचएसचे मानद सचिव डॉ. भारत भूषण यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे. किशोर रिठे यांनी यापूर्वी मराठीत ‘सातपुड्याचा सातबारा’, ‘रानावनाचे मूडस’ आणि ‘हिरवा संघर्ष’ हे ग्रंथ लिहिले आहेत. तसेच, इंग्रजीमध्ये ‘सातपुडा’ आणि ‘डस्क टू डॉन: अ स्टोरी ऑफ व्हिलेज रिसेटलमेंट इन मेळघाट’ ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *