![]()
नाशिक शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच नागरिकांचा नाहक बळी गेल्याने हा प्रश्न आता राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत मंत्री छगन भुजबळ यांनी महापालिका प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या या भूमिकेवर मंत्री गिरीश महाजन यांनी आपली प्रतिक्रिया दिल्यानंतर, या दोन्ही नेत्यांमध्ये अबोला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार रंगली होती. मात्र, आता स्वतः छगन भुजबळ यांनी यावर स्पष्टीकरण देत या सर्व राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला आहे. नाशिक शहरातील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांबाबत तीव्र संताप व्यक्त करत मंत्री छगन भुजबळ यांनी रस्त्यांच्या कामातील निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत देण्याची आग्रही मागणी केली. यावेळी प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढताना भुजबळ म्हणाले की, “जेवढे लोक मृत्यूमुखी पडले आहेत, ते शासनाच्या महापालिका यांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. एकाला जसा न्याय दिला तशीच रक्कम सर्वांना दिली पाहिजे. मंत्री गिरीश महाजनांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. जबाबदारी एकमेकांवर ढकलून चालणार नाही.” त्यांच्या या थेट वक्तव्यानंतर महायुतीतील या दोन वरिष्ठ मंत्र्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती, ज्यावर आता मंत्री गिरीश महाजन यांनी आपले स्पष्टीकरण दिले आहे. गिरीश महाजन यांनी भुजबळ यांच्या विधानावर बोलताना म्हटले की, जबाबदारी माझी आहे, मी कुंभमेळा मंत्री आहे. यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात कामे झाली होती का? नाशिककरांना त्रास होणार आहे हे मी सांगितले होते. डांबरी रस्ते टिकत नाहीत त्यामुळे व्हाइट टॉपिंग करत आहोत. चाळीस हजार कोटी खर्च करून चेहरा मोहरा बदलत आहे. एका रोडखाली सात प्रकारची युटिलिटी करत आहोत. सुविधा मिळणार आहे, कॅमेरा लावत आहोत. नवीन आणि मॉडर्न नाशिक आपण करत आहोत. येणाऱ्या सहा महिन्यात कामे पूर्ण होतील. नाशिककर म्हणतील आमच्या शहरासारखे शहर नाही, असे महाजन यांनी म्हटले आहे. महाजन यांच्यासोबत अबोला असल्याच्या चर्चांना भुजबळांकडून पूर्णविराम तर गिरीश महाजन यांच्यासोबत छगन भुजबळ यांनी अबोला धरल्याच्या चर्चा आहेत. यावर भुजबळ म्हणाले, हे सगळे मीडियाने क्रिएट केलेले पिक्चर आहे. तसेच साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे स्मारक लोकार्पण सोहळ्यात झालेल्या प्रसंगाचा उल्लेख करत भुजबळ म्हणाले, किंबहुना वरती हार घालायला जाताना गिरीश महाजन यांनी मला हात देऊन वर घेतले. तसेच कोणी भाषण करत असतो त्यावेळी आपण त्यांचे ऐकत असतो किंवा आपल्याला पुढे काय बोलायचे याचा विचार करत असतो, त्यामुळे असे काहीही नाही, असे म्हणत भुजबळ यांनी महाजन यांच्यासोबत अबोला असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
Source link
नाशिकच्या खड्ड्यांवरून भुजबळ-महाजनांमध्ये 'अबोला'?:छगन भुजबळांनी सर्व चर्चांना दिला पूर्णविराम, म्हणाले- "ते मीडियाने तयार केलेले चित्र.."