![]()
पोलिस दलाचा भरोसा सेल हा केवळ तक्रारींचे निवारण करणारा विभाग नसून तुटलेली नाती जोडणारे विश्वासाचे केंद्र असल्याचे मत पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा यांनी येथे व्यक्त केले. हिंगोली पोलिस अधीक्षक कार्यालयातील भरोसा सेलमार्फत समुपदेशन आणि तडजोडीतून तुटलेले संसार पुन्हा जोडण्यात आले आहेत. समुपदेशनानंतर आनंदी व सुखी संसार करणाऱ्या जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अपर पोलिस अधीक्षक कमलेश मीना, पोलिस उपअधीक्षक केंद्रे, भरोसा सेलच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रेमलता जगताप, उपनिरीक्षक शेख, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पंदोरे, जमादार सीमा पाटील, शिंदे, घुमनर, समुपदेशक खोडवे, सुरभी पांडव आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना पोलिस अधिक्षक लोढा म्हणाले की, कौटुंबिक वाद न्यायालयीन प्रक्रियेत न नेता संवाद, समुपदेशन आणि परस्पर समजुतीने सोडवले पाहिजे. भरोसा सेल हा केवळ तक्रारींचे निवारण करणारा विभाग नसून तुटलेली नाती जोडणारे विश्वासाचे केंद्र आहे. समुपदेशनाच्या माध्यमातून अनेक कुटुंबांमध्ये पुन्हा सलोखा निर्माण झाला असून अनेक जोडपी आज सुखी वैवाहिक जीवन जगत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी १७ जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तडजोड होऊन संसार करीत असलेल्या जोडप्यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. काही क्षणिक रागापोटी किंवा व्यसनामुळे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर होता, परंतु भरोसा सेलच्या योग्य समुपदेशनामुळे आज मुलाबाळांसह आनंदी आयुष्य जगत असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या तीन जोडप्यांनी विभक्त न होता पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतली. यावेळी त्यांचीही सत्कार करण्यात आला.
Source link
हिंगोलीत तडजोडीतून संसार जोडलेल्या जोडप्यांचा सत्कार:भरोसा सेल तुटलेली नाते जोडणारे विश्वासाचे केंद्र – पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा