![]()
अंजनगाव बारी प्रतिनिधी: गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंजनगाव बारी परिसरातील वडगाव (जिरे) येथील रायधोळ नदीला पूर आला आहे. या पुरामुळे वडगाव (जिरे)-मालखेड मार्गावरील पूल आणि स्मशानभूमीकडे जाणारा शेतकऱ्यांचा रस्ता वाहून गेला आहे. यामुळे शेतकरी, विद्यार्थी, पादचारी आणि ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरवर्षी पावसाळ्यात अशीच परिस्थिती निर्माण होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. पूल वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत आहे. विद्यार्थ्यांच्या शाळेतील ये-जा करण्यावरही परिणाम झाला आहे. तसेच, स्मशानभूमीकडे जाणारा एकमेव मार्ग बंद झाल्याने अंत्यविधीसारख्या अत्यावश्यक कामांमध्येही अडथळे येत आहेत. या भागातील सुमारे १५० शेतकऱ्यांची शेते याच परिसरात असल्याने हा पूल त्यांच्यासाठी जीवनवाहिनी होता. आता त्यांना शेतात जाण्यासाठी बराच वळसा घ्यावा लागत आहे. शेतमजूर, शेतीमाल वाहतूक याच मार्गाने होत असल्याने या पुलाचे बांधकाम तातडीने करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. हा पूल अंजनगाव बारी, बडनेरा आणि वडगाव येथून मालखेडला जाण्यासाठीही महत्त्वाचा मार्ग आहे, त्यामुळे या मार्गावरील वाहतूकही थांबली आहे. यापूर्वीही या पुलाची दुरुस्ती करण्यात आली होती, मात्र यंदाच्या पुरात तो पुन्हा वाहून गेल्याने कायमस्वरूपी मजबूत पुलाची गरज अधोरेखित झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून पूल व रस्त्याची दुरुस्ती करावी, तसेच भविष्यात कायमस्वरूपी मजबूत पुलाचे बांधकाम करावे, अशी जोरदार मागणी सरपंच धनश्याम ब्राह्मणे यांनी केली आहे.
Source link
पुरामुळे मालखेड-वडगाव रस्त्यावरील पूल वाहून गेला:नागरिकांची गैरसोय; तात्काळ दुरुस्तीची मागणी