![]()
पैठण तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर-पैठण महामार्गावरील कातपूर फाट्याजवळ असलेल्या श्रीक्षेत्र पावन गणपती मंदिरात रविवारी चतुर्थीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी झाली होती. दिवसभरात हजारो भाविकांनी पावन गणपतीचे मनोभावे दर्शन घेतले. हे मंदिर तालुक्यातील एक अत्यंत जागृत देवस्थान म्हणून परिचित असून, काही वर्षांपूर्वी या भव्यदिव्य मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. विशेषतः प्रत्येक चतुर्थीला आणि पवित्र श्रावण महिन्यात भाविक मोठ्या संख्येने येथे हजेरी लावतात. साधू-संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीतील मंदिरात वर्षभर प्रत्येक चतुर्थीला शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. या निमित्ताने विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून महाप्रसादाचे वाटप केले जाते. मंदिरातील पावन गणपतीची सुबक मूर्ती अत्यंत आकर्षक असून, समोरील गाभाऱ्यात मुशकाची मोठी दगडी मूर्ती लक्ष वेधून घेते. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात आलेल्या भक्तांसाठी दानशूर व्यक्ती व काही भक्तांच्या वतीने महाप्रसादाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. गणेशभक्तांना महाप्रसाद म्हणून पेढा, साबुदाणा खिचडी, फळे व अन्य फराळाचे वाटप करण्यात आले. या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात आनंदी आणि चैतन्यमय वातावरण पाहायला मिळाले. कातपूर फाटा येथील गणपती मंदिरात भाविकांनी दर्शन घेतले.
Source link
कातपूर फाटा येथील गणपती मंदिरात भाविकांनी घेतले दर्शन:संकष्ट चतुर्थीनिमित्त मूर्तीचे पूजन आणि महाभिषेक