Headlines

आरापूर एमआयडीसी दरनिश्चितीची दुसरी बैठक निर्णयाअभावी निष्फळ:प्रशासनाचा मोबदला, प्रत्यक्ष मागणीत तफावत‎




बहुचर्चित आरापूर औद्योगिक वसाहतीसाठी जमिनीच्या दरनिश्चितीबाबत जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांमध्ये रविवारी पार पडलेली दुसरी बैठकही निष्फळ ठरली. पांडव लॉन्स येथे आयोजित या बैठकीत गवळीशिवरा येथील शेतकऱ्यांनी ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’ अशा जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केला. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मनाविरुद्ध एक इंचही जमीन अधिग्रहित केली जाणार नाही. ८० टक्के शेतकऱ्यांचा सकारात्मक कौल असेल तरच एमआयडीसीचा विचार होईल, असा धीर आमदार प्रशांत बंब यांनी शेतकऱ्यांना दिला. छत्रपती संभाजीनगर शहरापासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या आरापूर परिसरात एमआयडीसी उभारण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी मोजणीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असली तरी मोबदल्याबाबत अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. प्रशासनाकडून दिला जाणारा संभाव्य मोबदला आणि शेतकऱ्यांची मागणी यामध्ये मोठी तफावत असल्याने दराची कोंडी निर्माण झाली आहे. याच परिसरामध्ये शेतजमीन खरेदी करता येईल, एवढा योग्य भाव आणि पुनर्वसन मिळावे, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. यावेळी दराची कोंडी फोडण्यासाठी जिल्हा प्रशासन व एमआयडीसीचे अधिकारी गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांची मनधरणी करत आहेत. या बैठकीला उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी अरुण जऱ्हाड, तहसीलदार नवनाथ वगवाड, एमआयडीसीचे अमित भामरे, मंडळ अधिकारी शिंदे, तलाठी अमर तोरंबे, बिरारे यांच्यासह लोकप्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते. तीन गावांतील ७६२.०३ हेक्टर जमीन : औद्योगिक वसाहतीमध्ये तीन गावांतील ७६२.०३ हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. यात आरापूर १७१.८० हेक्टर, सुलतानाबाद १७७.६२ हेक्टर आणि गवळीशिवरा येथील ४१२.६१ हेक्टर जमिनीचा समावेश आहे. यापैकी ८० टक्क्यांहून अधिक जमिनीची मोजणी पूर्ण झाली आहे. केवळ गाजर मळा भागातील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे तेथील मोजणीची प्रक्रिया बाकी आहे. पुरंदर पॅटर्नप्रमाणे मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणी पुरंदर पॅटर्नप्रमाणे संपादित होणाऱ्या जमिनींना प्रतिएकर १ कोटी ६१ लाख रुपये मोबदला मिळाला पाहिजे. आरापूर, गवळीशिवरा, सुलतानाबाद शिवारातील ८० टक्के जमीन स्थानिक शेतकऱ्यांची असून, या जमिनी सुपीक आहेत. या जमिनींचे आर्थिक मूल्य आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा विचार करून पुरंदर पॅटर्नप्रमाणेच योग्य व न्याय्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणी शेतकरी चंद्रकांत गवळी यांनी केली. बैठकीस दुसरेच लोक आले असल्याचेही ते म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *