![]()
शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होत असतानाच आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही नाराजी व्यक्त केल्यानंतर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिककरांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील आठ दिवसांत शहरातील सर्व खड्डे बुजवले जातील, तर चार महिन्यांत प्रमुख रस्त्यांची काँक्रीटीकरणाची कामे पूर्ण होतील. त्यानंतर किमान 40 वर्षे रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत, असा दावा त्यांनी केला. रविवारी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परिसरात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना महाजन यांनी शहरातील रस्त्यांच्या कामांबाबत भूमिका स्पष्ट केली. एकाचवेळी अनेक विकासकामांमुळे रस्ते खोदले महाजन म्हणाले की, नाशिकमध्ये केवळ रस्त्यांचीच नव्हे तर ड्रेनेज, पाणीपुरवठा, फायबर केबल, एमएनजीएल गॅस पाइपलाइनसह आठ ते नऊ विविध युटिलिटी सेवांची कामे एकाचवेळी सुरू आहेत. या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदावे लागले असून त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. “सध्या नागरिकांना मोठा त्रास होत असल्याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. मात्र ही कामे पूर्ण झाल्यानंतर नाशिकची पायाभूत सुविधा अधिक सक्षम होईल,” असे त्यांनी सांगितले. 8 दिवसांत खड्डे बुजवणार शहरातील खड्ड्यांवरून सातत्याने टीका होत असताना महाजन यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, युद्धपातळीवर खड्डे बुजवण्याचे काम सुरू असून पुढील आठ दिवसांत शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे भरले जातील. त्याचबरोबर, पुढील चार महिन्यांत काँक्रीट रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून त्यानंतर दीर्घकाळ खड्ड्यांची समस्या निर्माण होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीवर काय म्हणाले? खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीव जात असल्याने अधिकारी आणि कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत असल्याबाबत विचारले असता महाजन म्हणाले, “गुन्हे दाखल करून प्रश्न सुटणार नाही. संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांना कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.” त्यांनी सांगितले की, मागील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वेळी सुमारे तीन हजार कोटी रुपयांची कामे झाली होती. मात्र यावेळी विविध विभागांची अनेक मोठी कामे एकाचवेळी सुरू असल्याने परिस्थिती वेगळी आहे. मखमलाबाद परिसरातील खड्ड्यांची पाहणी आरोग्य विज्ञान विद्यापीठात जाताना मखमलाबाद-म्हसरूळ मार्गावरील खड्ड्यांचा त्रास महाजन यांनी स्वतः अनुभवला. त्यांनी वाहनातून उतरून रस्त्यांची पाहणी केली आणि नागरिकांना होत असलेल्या अडचणीची कबुली दिली. कार्यक्रमातही त्यांनी सार्वजनिकपणे खड्ड्यांमुळे होणाऱ्या गैरसोयीची जाणीव असल्याचे सांगत, लवकरच परिस्थिती सुधारेल, असे आश्वासन दिले. दीपाली बेळे यांच्या कुटुंबाला मदतीची घोषणा खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या दीपाली बेळे यांच्या कुटुंबीयांची महाजन यांनी भेट घेतली. त्यांच्या उपचारासाठी मोठा खर्च झाल्याने राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पावसामुळे कामांना अडथळा महाजन यांनी सांगितले की, यंदाच्या विक्रमी पावसामुळे कंत्राटदारांना कामे पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. तरीही विविध तांत्रिक पद्धतींचा वापर करून खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. तसेच डांबर आणि व्यावसायिक डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रत्येक प्रकल्पाच्या खर्चात सहा ते सात कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगीने कंत्राटदारांना ‘स्टार रेट’ मंजूर करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, राजकीय प्रश्नावर बोलताना महाजन यांनी “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची तुलना होऊच शकत नाही,” अशी प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर स्वच्छतेच्या बाबतीत इंदूरनंतर नाशिकचा देशात दुसरा क्रमांक असल्याचा दावाही त्यांनी केला. हेही वाचा… राजकारणातून नाही, भाजपमधून बाहेर पडा: आम्ही तुम्हाला राज्याची पहिली ओबीसी मुख्यमंत्री करू; विजय वडेट्टीवारांची पंकजा मुंडेंना ऑफर भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतेच राजकारणातून निवृत्ती घेण्याबाबत काही संकेत दिले होते. त्यांच्या या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आता यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अत्यंत सूचक आणि मोठी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांनी राजकारणातून निवृत्त होण्याऐवजी भाजपमधून बाहेर पडावे, आम्ही त्यांना महाराष्ट्राची पहिली ओबीसी मुख्यमंत्री करण्यासाठी पूर्ण साथ देऊ, अशी थेट आणि खुली ऑफरच वडेट्टीवार यांनी दिली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
खड्ड्यांवरून टीकेनंतर गिरीश महाजनांची ग्वाही:8 दिवसांत खड्डे बुजवणार, 4 महिन्यांत नाशिकचे सर्व रस्ते काँक्रीटचे