Headlines

जातिनिहाय जनगणना झालीच पाहिजे:ओबीसींच्या हक्कासाठी सरकारला झुकविल्याशिवाय थांबणार नाही, विजय वडेट्टीवारांचा एल्गार




सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने आयोजित मंडल यात्रा २०२६ ची आज भंडारा येथून उत्साहात सुरुवात झाली. यावेळी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी यात्रेला हिरवा झेंडा दाखवत ओबीसी समाजाच्या हक्कांवर भाष्य करत केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आणि ओबीसी समाजाला त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून ही मंडल यात्रा सातत्याने सुरू आहे. ओबीसी समाजाने संघटित होऊन आपल्या अधिकारांसाठी लढण्याची ताकद निर्माण करणे, हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे. ओबीसी नोंदीबाबत विश्वास कसा ठेवायचा? लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत ओबीसी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर केंद्र सरकारने जनगणनेची घोषणा केली. मात्र, आता सुरू असलेल्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम नाही. टीका झाल्यावर आता सरकार दुसऱ्या टप्प्यात तो समाविष्ट केला जाईल, असे सांगत आहे. पण पहिल्या टप्प्यातच ओबीसींची नोंद नसेल, तर दुसऱ्या टप्प्यात ती होईल, यावर विश्वास कसा ठेवायचा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारला झुकण्यास भाग पाडूया वडेट्टीवार म्हणाले की, ओबीसी समाज सरकारसमोर झुकणार नाही. उलट सरकारला झुकवून ओबीसींसाठी स्वतंत्र जातनिहाय जनगणनेचा कॉलम समाविष्ट करण्यास भाग पाडूया. भंडाऱ्यातील ओबीसी समाजाच्या मोठ्या सहभागाने ही ताकद आज दिसून आली आहे. ते पुढे म्हणाले की, ही लढाई कोणत्याही पदापेक्षा मोठी आहे. आमदारकी, मंत्रीपद किंवा सत्तेतील स्थान येत-जात राहते मात्र ओबीसी समाजाचे हक्क कायमचे आहेत. मी येथे काँग्रेस पक्षाचं आमदार किंवा नेता म्हणून नव्हे, तर ओबीसी समाजाचा कार्यकर्ता म्हणून उभा आहे. या समाजाच्या हक्कांसाठी शेवटपर्यंत संघर्ष करणार, असे वडेट्टीवार यांनी यावेळी स्पष्ट केले. ओबीसी महामंडळाला कमी निधीची तरतूद राज्य सरकारवर टीका करताना त्यांनी म्हटले की, विविध समाजांच्या विकास महामंडळांना मोठा निधी दिला जातो, मात्र ओबीसी महामंडळाला केवळ ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात ओबीसींची लोकसंख्या जवळपास ५० टक्के असताना त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी पुरेशी वसतिगृहे नाहीत, जिल्हास्तरावर सुविधा उपलब्ध नाहीत आणि महाज्योती संस्थेलाही अपुरा निधी दिला जात आहे. महाज्योतीसाठी १ हजार कोटींची तरतूद करावी ओबीसी मंत्री असताना स्वतः ७२ वसतिगृहांना मंजुरी दिली होती. आणखी कालावधी मिळाला असता, तर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये वसतिगृहांचे जाळे उभे केले असते, असे त्यांनी सांगितले. महाज्योतीसाठी किमान एक हजार कोटी रुपयांची तरतूद करावी, प्रत्येक जिल्हा आणि तालुकास्तरावर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे उभारावीत, अशी मागणी त्यांनी केली. ओबीसींचे राजकीय प्रतिनिधित्व कमी करण्याचा प्रयत्न राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नामुळे रखडल्या आहेत. लाखो पदे रिक्त आहेत. ओबीसी समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. जातनिहाय जनगणना ही केवळ आकड्यांची बाब नसून ओबीसी समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात शिक्षण, रोजगार, निधी आणि राजकीय प्रतिनिधित्व मिळवून देण्याचे प्रभावी साधन आहे. त्यामुळे या लढ्यात प्रत्येक ओबीसी बांधवाने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. मोर्चात अनेक ओबीसी नेत्यांची उपस्थिती आज या मोर्च्यात सकल ओबीसी महामोर्चा मुख्य समन्वयक उमेश कोराम यांच्यासह काँग्रेस जिल्हाध्यक्ष मुकुंद साखरकर, प्यारेलाल वाघमारे, जिया पटेल, मंगेश हुमने, जयश्री बोरकर, धनराज सातवां, प्रमोद तितरमारे,गोपाल सेलोकर, बाळकृष्ण सार्वे, रमेश शहारे, मंगला वाडीभस्मे, ललिता देशमुख, सुरेश खंगार, मोंटु पिल्लारे, अनिल डहाके, के झेड शेंडे, शरद इटवले, रोशन उरकुडे, रोशन जांभूळकर, सुधाकर मोथलकर, सुभाष पाल, विष्णुजी जगनाडे, पंजाबराव कारेमोरे, भैयाजी लांबट, शुभदा झंझाड, ओबीसी सेवा संघ, ओबीसी संघर्ष समिती, संविधान बचाव संघर्ष समिती, एकलव्य संघटना यांच्यासह भंडारा जिल्ह्यातील विविध ओबीसी संघटनांचे पदाधिकारी आणि हजारो ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने आयोजित ही यात्रा विदर्भातील ११ जिल्ह्यांतून मार्गक्रमण करणार असून ९ ऑगस्ट रोजी चंद्रपूर येथे यात्रेचा समारोप होणार आहे. हे ही वाचा… TV वर बंद, पण यूट्यूबवर सुपरहिट!:डॉ. अमोल कोल्हेंची ‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिका आता आठवड्याचे 6 दिवस टीआरपीच्या वाढत्या स्पर्धेमुळे वाहिन्यांनी नव्या मालिकांचा धडाका लावला असून, याचा फटका डॉ. अमोल कोल्हे आणि अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ या मालिकेला बसला. वाहिनीने अवघ्या पाच महिन्यांत आणि 152 भागांतच या मालिकेला अचानक निरोप दिला. मात्र, मालिका अशा प्रकारे बंद झाल्यानंतर यातील मुख्य अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी ती कोणत्याही परिस्थितीत सुरू ठेवण्याचा ठाम निश्चय केला आणि त्यांच्या याच जिद्दीमुळे टेलिव्हिजनवर मालिका बंद झाल्यानंतर अवघ्या सहा दिवसांतच ती यूट्यूबच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *