Headlines

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात मानवी विचारशक्ती जपणे गरजेचे:डॉ. गणेश नटराजन यांचे सिंबायोसिसच्या स्वागत समारंभात प्रतिपादन




कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात मानवी विचारशक्ती जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योगपती डॉ. गणेश नटराजन यांनी केले. सिंबायोसिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि सिंबायोसिस स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटच्या संयुक्त नवागत विद्यार्थी स्वागत समारंभ व वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. नटराजन म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणे आवश्यक आहे, कारण तिचा वापर न करणारा माणूस आदिमानवासारखा आहे. मात्र, मानवी बुद्धिमत्ता कधीही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या स्वाधीन करू नये. त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सकारात्मक ध्येये ठरवून ती साध्य होईपर्यंत प्रयत्न करत राहण्याचे आवाहन केले. डॉ. नटराजन हे जीटीटी डेटा सोल्यूशन्स, लाइटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन आणि 5 एफ वर्ल्डचे कार्यकारी अध्यक्ष व सह-प्रवर्तक आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना संवाद साधण्याची, ऐकून घेण्याची आणि विचार प्रभावीपणे मांडण्याची तयारी ठेवण्याचे महत्त्व सांगितले. माहितीचे विश्लेषण आणि त्यातून मिळणाऱ्या आकलनावर प्रभुत्व मिळवणाऱ्यांचेच भविष्य उज्ज्वल असेल, असे ते म्हणाले. यशस्वी जीवनासाठी त्यांनी ‘वेगवान, एकाग्र, लवचिक, मैत्रीपूर्ण आणि आनंदी राहा’ हा मंत्र दिला. या कार्यक्रमाला सिंबायोसिसचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण आणि कुलपती डॉ. विद्या येरवडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सिंबायोसिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या संचालिका प्रा. ज्योती चंदीरामणी यांनी प्रास्ताविक केले, तर सिंबायोसिस स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. शर्वरी शुक्ला यांनी आभार प्रदर्शन केले. डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी शिक्षण आणि अर्थव्यवस्थेतील जवळचा संबंध अधोरेखित केला. दर्जेदार शिक्षण असलेल्या देशांचाच खरा विकास होतो, असे ते म्हणाले. भारतात विद्यापीठे आणि महाविद्यालयांची संख्या मोठी असली तरी, दर्जेदार शिक्षणाच्या अभावामुळे बेरोजगारीचे आव्हान कायम असल्याचे त्यांनी नमूद केले. नैतिक मूल्यांचे महत्त्व सांगताना डॉ. मुजुमदार म्हणाले की, नैतिकतेशिवायचे शिक्षण ‘राक्षस’ निर्माण करते. त्यामुळे चांगल्या शिक्षणासोबत नैतिक आणि मूल्याधिष्ठित शिक्षणही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना आत्मसात करण्याचे आवाहन केले. विद्यार्थीदशेतील हा काळ आत्मविकासासाठी वापरावा, असेही त्यांनी सांगितले. चारित्र्याशिवायचे ज्ञान अपूर्ण असून, ज्ञानाला चारित्र्याची जोड मिळाल्यासच व्यक्ती खऱ्या अर्थाने सुशिक्षित बनते, असे डॉ. मुजुमदार यांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *