Headlines

'अपयशाची भीती बाळगू नका':सिद्धार्थ जाधवचा तरुणाईला मंत्र, चिंचवडमधील ‘दिलखुलास गप्पा’ कार्यक्रमात सकारात्मकतेचा संदेश




सुप्रसिद्ध मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधवने तरुणाईला जीवनात अपयशाची भीती न बाळगता सकारात्मक विचारांनी प्रयत्नशील राहण्याचा सल्ला दिला. कोणतीही कृती पूर्ण क्षमतेने आणि समर्पण भावनेने केल्यास यश निश्चित मिळते, असे त्याने सांगितले. चिंचवड येथे प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि दिशा सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सिद्धार्थ जाधवशी दिलखुलास गप्पा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे दीड तास चाललेल्या या कार्यक्रमात सिद्धार्थने विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी बोलताना सिद्धार्थने स्वतःच्या दिसण्याबद्दल असलेल्या न्यूनगंडाचा उल्लेख केला. तो म्हणाला की, ‘स्वतःमध्ये जे आहे ते प्रथम स्वीकारावे आणि स्वतःवर प्रेम करायला शिकले पाहिजे. माझा आरसा देखील मला प्रेरणा देतो.’ स्वतःच्या क्षमता ओळखून कोणतीही कृती समर्पण भावनेने केल्यास ते सर्वोत्तमच ठरते, असे त्याने नमूद केले. जाधवने पालकांबद्दलही महत्त्वाचा सल्ला दिला. ‘जगात तुमचे आई-वडील हेच तुमचे ‘बेस्ट फ्रेंड’ आहेत. त्यांना कधीही ‘इमोशनल ब्लॅकमेल’ करू नका,’ असे आवाहन त्याने केले. पालकांशी नेहमी आदरयुक्त संवाद ठेवण्याचे महत्त्व त्याने अधोरेखित केले. महाराष्ट्र शासनाने आपल्याला व्यसनमुक्तीचा ‘ब्रँड अँबेसिडर’ केले, हा आपल्या आई-वडिलांच्या संस्कारांचा सन्मान असल्याचे त्याने सांगितले. सर्वच क्षेत्रात अपयश येते, परंतु ते कायमस्वरूपी नसते. त्यातून निराश न होता दारू, सिगारेटसारख्या व्यसनांपासून दूर राहावे आणि नैराश्यात कधीही आत्महत्येचा विचार करू नये, असेही सिद्धार्थने स्पष्ट केले. रूप आणि सौंदर्य नश्वर असून, आपल्या कर्तृत्वातून आपले वलय निर्माण करावे, यावर त्याने भर दिला. ‘मला एफटीआयआय किंवा ललित कला केंद्रात प्रवेश मिळाला नाही. मला द्रोणाचार्य मिळाले नाहीत. मात्र, मी अनुभवाच्या जोरावर एकलव्य होऊ शकलो,’ अशा भावना त्याने व्यक्त केल्या. यावेळी प्रतिभा इन्स्टिट्यूटचे संस्थापक सचिव दीपक शहा, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वनिता कुऱ्हाडे, दिशा सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब जवळकर यांच्यासह राजेंद्र करपे, गोरख भालेकर, सचिन साठे, नाना शिवले, संतोष बाबर, अविनाश ववले, नंदकुमार कांबळे आणि संतोष चांदेरे आदी मान्यवर उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *